तडजोडीचा डाव चुकीचा, पर्याप्त पुरावे देणार – पोलिस सुप्रीम कोर्टात जाऊन बाजु मांडणार
धाराशिव – समय सारथी
फय्याज काझी या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात सुरेश कांबळे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिले, त्या निर्णयाच्या विरोधात धाराशिव पोलिस सुप्रीम कोर्टात अपील करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी दिली आहे. आत्महत्या गुन्ह्यात धाराशिव पोलिसांनी ठोस भुमिका घेतली असुन अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या गुन्ह्यात तपासा दरम्यान सुरेश कांबळे यांच्या विरोधात पर्याप्त पुरावे असुन ते पुरावे पोलिस सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत, यात तडजोड करता येणार नसल्याचे पोलिसांचे मत आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून कांबळे यांचे नाव वगळण्यात यावे असे आदेश न्यायमुर्ती संदीप कुमार मोरे व मेहरोज पठाण यांनी दिले आहेत. मयत फय्याज यांची आई व कांबळे यांच्यात ‘तडजोड’ करण्यात आली त्यानंतर ते प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आले होते. मात्र धाराशिव पोलिस आता या निर्णयाला विरोध करणार आहेत. तपास अधिकारी तथा तत्कालीन भुम पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या तपासात आलेल्या बाबी व पुरावे वेगळे आहेत त्यामुळे पोलिस अपिलात गेले आहेत.
भुम कोर्ट, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने कांबळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत दिलासा दिला नव्हता, त्यांनी कोर्टात शरण यावे, पोलिसांनी शोध घ्यावा असे आदेश दिले मात्र कांबळे फरार राहिले. कांबळे व मयताच्या आईने एकत्र येत ‘आमचे मिटले, गैरसमज झाला होता, संबंध व तक्रार नाही’ असे म्हणत ‘तडजोड’ केल्याने उच्च न्यायालयाने गुन्ह्यातून नाव वगळले. आईने तक्रार देत गुन्हा नोंद केला मात्र नंतर कोर्टात माघार घेतली.
कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आत्मसमर्पण आदेशाचे उल्लंघन केले, ते कायदेशीर पळ काढत आहेत. पोलिसांनी तातडीची पावले उचलून आरोपीचा शोध घ्यावा व अटक करुन कार्यवाही करावी असे निर्देश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अद्वित सेठना यांच्या कोर्टाने दिले होते, त्यानंतर कांबळे यांनी ‘तडजोड’ करण्याचा डाव खेळला व तो यशस्वी झाला मात्र त्याच्या विरोधात अपील केले आहे.
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. फय्याज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्याला झालेल्या त्रासाची कहाणी सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, त्यात कांबळे यांच्यासह अन्य आरोपीची नावे घेतली होती. सुरेश कांबळे यांच्यासह अन्य आरोपीवर 21 जुन 2023 रोजी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे ) 323, 504,506 आणि 34 याखाली 157/2023 गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 35 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कांबळे यांनी छळ, मारहाण केल्याचा आरोप होता.
आत्महत्या केल्यावर माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती विडिओमध्ये करीत फय्याज यांनी आत्महत्या केली होती.









