भुम, परंडा – समय सारथी
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा डाॅ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असुन ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुमचा मस्साजोग सारखा संतोष देशमुख करु असे जिवे मारीचे धमकी पत्र मिळाल्यावर पोलिसांनी आरोपीना अटक करुन कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी यांना शिवसैनिकांनी कारवाईचे निवेदन दिले तर भुम परंडा येथे रस्त्यावर उतरत आंदोलन केले व कडकडीत शहर बंद ठेवुन निषेध करण्यात आला.
भुम व परंडा तालुक्यातील सर्व शिवसेना,युवा सेना, महिला आघाडी व शिवसेना पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात झाली. परंडा येथे जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा संपर्क कार्यालय पासुन निघाला बावची चौक शिवाजी चौक आंबेडकर चौक येथे पोहचला.आंबेडकर चौक ऐथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व ज्यांनी धमकीचे पत्र दिले त्यांना योग्य तपास करुन अटक करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
भूम येथे शहर बंद करुन ज्ञानेश्वर गीते यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धमक्या देणाऱ्या भ्याड गुंडाचा निषेध करुन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देवून या घटनेचा तात्काळ तपास करुन आरोपींना अटक करुन कारवाई अशी मागणी केली अन्यथा नजीकच्या काळात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. केशव सावंत व धनु सावंत तुमचा पण संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल असे या पत्रात नमुद केले असुन त्या पत्रासोबत 100 रुपयाची नोट देखील जोडली आहे. पत्रातील मजकूर हा पेन्सिलने स्केच करुन लिहला आहे.
आधी गोळीबार व त्यानंतर धमकीचे पत्र, आमच्या जीवाला काही दगा फटका झाल्यावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून तक्रार करणार असल्याचे धनंजय सावंत यांनी सांगितले. राजकारणातुन हे सुरु आहे की इतर काही हे तपासावे अशी मागणी त्यांनी केली. धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर 13 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात इसमानी दुचाकीवर येऊन 4 राऊंड फायर केले होते त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेते हे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येण्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती, या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरु असुन आरोपीचा शोध लागलेला नाही. त्यातच धमकीचे पत्र आले असल्याने खळबळ उडाली आहे.