धाराशिव – समय सारथी
शहरातील रसुलपुरा भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत 51 गोवंशीय जनावरे, 405 किलो गोमांस, तीन वाहने असा मिळून एकूण 43 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रसुलपुरा भागातील अलीम कुरेशी यांच्या घराजवळील कंपाउंडमध्ये कारवाई करण्यात आली. घटनास्थळी मोकळ्या जागेत गायी व वासरे बांधलेली, काही वाहने उभी आणि गोमांसाचा साठा असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे जनावरे कापण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी सत्तूर, सुरी व आकडेही आढळले.
घटनास्थळी अलीम मजिद कुरेशी (वय 38, रा. रसुलपुरा), मुज्जमिल शाकीर शेख (वय 20, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि इंद्रजित विश्वास पैठणकर (वय 37, रा. मालेगाव बुद्रुक, ता. बारामती, जि. पुणे) हे तिघेही उपस्थित होते. त्यांच्याकडून दोन आयशर टेम्पो (MH 45-0927, MH 12-AR-9825) आणि एक पिकअप वाहन (MH 12-EQ-3778) जप्त करण्यात आले. वाहनांमध्ये एकूण 51 गोवंशीय जनावरे (गायी व वासरे) तसेच 405 किलो गोमांस आढळून आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- दराडे, स्था.गु.शा. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हावलदार समाधान वाघमारे,विनोद जानराव, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, बबन जाधवर, अशोक ढगारे, चालक पोलीस हावलदार विजय घुगे, पोलीस ठाणे धाराशिवचे पोलीस हावलदार आडगळे, पोलीस अमंलदार राम कनामे, दंगा काबु पथक, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अधिकारी अमंलदार यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास धाराशिव शहर पोलीस ठाणे करत आहेत.