धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील बस स्थानकाच्या कामासाठी लाच घेताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत अरुण उबाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी रंगेहाथ अटक केली.
तक्रारदार हे व्यवसायाने गुत्तेदार असून, त्यांना धाराशिव बसस्थानक परिसरातील वाहनतळाचा ताबा मिळवण्यासाठी व त्याच परिसरातील कँटीनजवळील पार्किंग शटर बंद करून देण्यासाठी उबाळे यांनी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. यातील 5 हजार रुपये तात्काळ घेतले, तर उर्वरित 10 हजार रुपये उर्वरित देण्याची मागणी सुरूच होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत उबाळे यांनी डीसी साहेबांसाठी 5 हजार व स्वतःसाठी 4 हजार रुपये अशी एकूण 9 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
लाचलुचपत विभागाने सापळा रचून उबाळे यांना धाराशिव बसस्थानक आवारात पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यावेळी लाच रक्कम, मोबाईल फोन व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. पुढील तपासासाठी त्यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले असून, आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अटक करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विजय वगरे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे (लाचलुचपत विभाग, छत्रपती संभाजीनगर), प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे तसेच पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी केले.