धाराशिव – समय सारथी
आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 95 हजार स्वीकारल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंद केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या सारख्या गुन्ह्यात व सहकारी पोलीस महिलेकडुन लाच घेतल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे.
लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना ताब्यात घेऊन लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात पुढील कारवाईसाठी आणण्यात आले, त्यावेळी पोलीस निरीक्षक शेळके यांनी स्तिथीचा अंदाज घेत नजर चुकवीत संधी साधत लाचलुचपत कार्यालयातून पळ काढला. लाचलुचपत कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज चौक, आरपी कॉलेज रोड असा पाठलागाचा मॅरेथॉन सामना रंगल्यानंतर पोलिसांनी शेळके यांना अखेर लेडीज क्लब येथे पकडून दुचाकीवर बसून कार्यालयात आणले. भर चौकात झालेल्या या फिल्मी स्टाईल पाठलागाची मोठी चर्चा होत असुन हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
आत्महत्या प्रकरणात तक्रारदार महिला पोलीस कर्मचारी यांच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी शेळके व लोखंडे या जोडीने कोणतीही तमा न बाळगता लाच मागितली मात्र सहकारी पोलिसाकडुन त्यांच्या या लाचखोरीचा भांडाफोड करण्यात आला हे विशेष. तक्रारदार महिलेमुळे या जोडीची लाचखोरी उघड झाली असुन अनेक रंजक किस्से एकामागुन एक उघड होत आहेत. आत्महत्या सारख्या गुन्ह्यात लाच घेणे हे एक प्रकारचे मडयाच्या टाळूवरील लोणी खाल्यासारखे आहे. आर्थिक मोह व हव्यासामुळे बेभान झालेली ही जोडी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकली असुन हातात बेड्या पडल्या आहेत, त्यांना 27 जुन रोजी कोर्टात हजर केले जाणार आहे.
लोखंडे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7(अ) अन्वये आणि पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांच्याविरोधात कलम 12 अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे, निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी केली. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मार्गदर्शन लाभले.