धाराशिव – समय सारथी
1 लाख रुपयांची लाच मागुन तडजोडी अंती 95 हजार रुपये लाच स्वीकारताना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता प्रकाश लोखंडे यांना अटक केली आहे. ही कारवाई शासकीय विश्रामगृहाजवळ करण्यात आली. एका तपासातील आरोपीला मदतीच्या बदल्यात ही लाच मागितली होती.
एका ४८ वर्षीय महिलेनं आपल्या मुलावरील गुन्ह्यात मदत व्हावी म्हणून संपर्क साधला होता. या प्रकरणी मुक्ता लोखंत या महिला पोलीस कर्मचारी यांनी स्वत:साठी आणि पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून विश्रामगृहासमोर 95 हजार रुपये लाच स्वीकारताना मुक्ता लोखंडे हिला रंगेहाथ पकडले.
कारवाई दरम्यान तक्रारदाराच्या हातून पैसे घेतल्यानंतर पंचासमक्ष लोखंडे हिला अटक करण्यात आली. यानंतर तिच्या ताब्यातून एक ओपो मोबाईल, बजाज मोटारसायकल, चावी व ओळखपत्र जप्त करण्यात आले. यासोबतच मारुती शेळके यांच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त करून त्यांचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
या प्रकरणी लोखंडे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७(अ) अन्वये आणि पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांच्याविरोधात कलम १२ अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे, निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचेही मार्गदर्शन लाभले.