धाराशिव – समय सारथी
लोकसेवक बाबासाहेब धोंडीराम शिगे, वय-56 वर्षे, पद-सचिव, सेवा सहकारी संस्था मर्यादित, वानटाकळी ता. परळी वैजनाथ जि. बीड, रा. गुरुकृपा नगर परळी वैजनाथ, ता. परळी वैजनाथ जि. बीड व अंकुश पवार, सचिव,सेवा सहकारी संस्था, सारटगाव, ता. परळी वैजनाथ, जि. बीड. रा. तलखेड, ता. माजलगाव, बीड यांना 1 लाख 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
विशेष म्हणजे या दोघांनी लाच मागितल्याची पडताळणी 12 फेब्रुवारी व 9 मे रोजी करण्यात आली होती तेव्हा पासुन लाचलुचपत विभाग या दोघांवर पाळत ठेवुन होता, अखेर ते 22 ऑगस्ट रोजी जाळ्यात अडकले.
तक्रारदार यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित, वानटाकळी, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड या संस्थेचे सन 2008 ते सन 2021 पर्यंतचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला होता. तक्रारदार यांनी केलेल्या लेखापरीक्षणचे नियमानुसार शुल्क रक्कम 2,51,571 रुपये चा चेक तक्रारदार यांना देण्यासाठी यातील आरोपीनी पंचासमक्ष देय रक्कमेच्या निम्मी रक्कम 1,25,000 रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. यातील आरोपीने लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. सदर लाच रक्कम सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारली असता सचिव शिंगे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे परळी वै. शहर जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी नानासाहेब कदम पोलीस निरीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट, मार्गदर्शक अधिकारी संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील सिद्धेश्वर तावस्कर , सचिन शेवाळे, दत्तात्रेय करडे यांचा समावेश आहे.