धाराशिव – समय सारथी
कानून के हात बडे लंबे होते है याप्रमाणे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या 27 वर्षांपासुन रात्रीची घरफोडी, दरोडा टाकून गंभीर दुखापत करण्याच्या 2 गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस मोठ्या शिताफिने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे या कामगिरी निमित्त कौतुक होत आहे.
कुंभकर्ण उर्फ कुमार अब्दुल्ला पवार वय 55 वर्षे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन तो त्यावेळी जळकोटवाडी येथे राहत होता मात्र तो नाव व रूप बदलून मोमीन नगर सोलापूर येथे होता.त्याच्यावर 1994 व 1997 साली मुरूम आणि लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद होते तेव्हापासुन तो फरार होता.
सुमारे 27 वर्षापासून फरार असलेला आरोपी याची स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अमोल चव्हाण यांनी गोपनीय बातमीदार मार्फत माहिती काढून त्यास अतिशय शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट्स पोलीस ठाणे मुरूम येथे हजर केले.
पवार याच्यावर मुरूम पोलीस ठाण्यात गुरनं 9/1994 कलम 457,397 भादंवि व पोलीस ठाणे लोहारा गुरनं 50/1997 कलम 457,380 भादंवि नुसार गुन्हा नोंद होता.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी शैलेश पवार,पोहेका हुसेन सय्यद,पोना अमोल चव्हाण, चापोहेका अरब यांच्या पथकाने ही कामगिरी केली.