धाराशिव – समय सारथीमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाच्या 108 फुटाचे ब्रॉन्झ शिल्प कसे असावे यावरून वाद सुरु आहे. तुळजाभवानी मातेची मूर्ती अष्टभुजा असावी की द्विभुजा यावरून वाद सुरु आहे.
तुळजाभवानी मातेची मूळ मूर्ती ही अष्टभुजा असून गंडकी पाषाणाची आहे. तुळजाभवानी मातेच्या या मूर्तीला वस्त्र, अलंकार घालून तिची पुजा केली जाते, देवीचे तेच रूप भाविकांत जगमान्य आहे. मंदिर संस्थान देखील याच रूपाला मान्यता देत त्याचे फोटो भाविकांना देते.

शिवभवानी मूर्ती ही अष्टभुजा करण्याचा घाट सुरु असून ती मुर्ती नवरात्र उत्सवातील भवानी तलवार अलंकार पुजा स्वरूपातील करावी अशी भाविकांची मागणी आहे. जर अष्टभुजा मूर्ती केली तर मंदिर संस्थान तुळजाभवानी मातेचे मूळ रूपातील मूर्तीचा प्रचार व प्रसार करणार का ? असाही सवाल विचारला जात आहे.
श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तुळजापूर येथे 108 फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून मंदिर प्रशासनाने फायबरचे मॉडेल महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली 31 ऑगस्टपर्यंत मागविले आहे.
शिल्प मागवताना जी माहिती देण्यात त्यात तुळजाभवानी मातेच्या मुळ मूर्तिचे वर्णन देण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार पुजा करण्यात येते, यात द्विभुजा असलेली भवानी आहे. हा सर्वमान्य असलेला देखावा भाविकाच्या मनात व डोळ्यात आहे. हा देखावा किंवा त्याची माहिती शिल्पकार यांना जाणीवपूर्व न देता त्याला बगल देत केवळ अष्टभुजा मूर्तिचे वर्णन देण्यात आहे.
तुळजाभवानी मातेची शिव भवानी तलवार मूर्ती ही अष्टभुजा असावी असे स्पष्ट मत पालकमंत्री तथा विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी व्यक्त केले असले तरी आमदार तथा मंदिर विश्वस्त राणाजगजीतसिंह पाटील यांचा आग्रह व अट्टहास वेगळाच आहे. जिल्हा प्रशासन आमदार राणा यांच्या प्रेमात असून त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरु आहे.
अष्टभुजा रूपातील भवानी ही भारत मातेसारखी दिसते, हवे तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्वखर्चातुन भारत मातेचे वेगळे शिल्प करावे मात्र मूळ अलंकार पूजेची मूर्ती असावी अशी भाविक, पुजारी यांची मागणी आहे. काही जणासाठी हा मंत्रीपदाचा राजमार्ग असून सत्तेच्या लालसेपोटी काही नवीन प्रयोग सुरु आहे.