भूमाफिया , सावकारकी, हद्दपारीसह शिक्षा – देवानंद रोचकरी यांच्या गुन्ह्यांचा मोठा इतिहास
मंत्रालयातुन स्थगिती आणि शेवटी मंत्रालयातच अटक , पोलिसांसमोर अनेक आव्हाने
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील पुरातन मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी गेल्या 8 दिवसापासून फरार असलेल्या आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून रोचकरी याना मुंबई मंत्रालय परिसरातून अटक केली आली आहे.अखेर देवानंद रोचकरी यांना मंत्रालय प्रेम घातक ठरले, या संपूर्ण नाट्यमय प्रकरणी मंत्रालय हे केंद्रबिंदू ठरले.राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातुन होतो तिथे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी मंत्रालयात खुलेआम वावरतो यावरून मंत्रालय सुरक्षा व इतर यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रोचकरी हे मंत्रालयात कोणत्या मंत्र्यांना भेटले ? त्यावेळी उस्मानाबादचे कोण लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावर मोठी चर्चा होत आहे.
फरार रोचकरी हे मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने तुळजापूर पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने रातोरात मुंबई येथे जाऊन रोचकरी यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी अटकेची माहिती दिली आहे.रोचकरी यांना अटक केल्यावर त्याची नोंद मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन त्यांना उस्मानाबाद पोलीस तुळजापूर येथे घेऊन येत आहेत. तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहूल रोटे,पोलीस हवालदार अजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंकावती प्रकरणी 4 मुद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याला रोचकरी यांनी मंत्रालयातुन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थगिती आणली व त्यानंतर सुनावणी अंती मंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठवली होती त्यामुळे रोचकरी बंधूवर गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा नोंद झाल्यावर पुढील कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी रोचकरी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळेल या आत्मविश्वासाने व आशेपोटी मंत्रालय गाठले होते मात्र तिथेच त्यांना उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली.
मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यासह अन्य आरोपीवर गुन्हा नोंद होता मात्र त्यातील देवानंद याना अटक केली असून बाळासाहेब रोचकरी फरार आहेत. बनावट कागदपत्रे तयार करण्यात कोण कोण अधिकारी सहभागी होते हे पोलीस तपासात बाहेर येणार आहे. रोचकरी यांना अटक केल्यानंतर खरी या प्रकरणाच्या कारवाईला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. रोचकरी यांच्या गुन्ह्यांची भूमिका न्यायालयात मांडून तपास करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
देवानंद रोचकरी यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद असून त्यात सावकारकी , शासकीय जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे, नागरिक व शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे , जीवे मारण्याचा प्रयत्न करणे याचा समावेश आहे, यातील अनेक प्रकरणे निर्दोष निकाली लागली आहेत मात्र गुन्ह्याची यादी व दहशतीचा इतिहास मोठा आहे. रोचकरी याच्यावर यापूर्वी 2 वेळेस हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. उस्मानाबाद पोलीस दलाने अखेर तुळजापूर येथील मोठ्या भूमाफियास अटक केली आहे त्यामुुुळे उस्मानाबाद पोलिसांचे कौतुक होत आहे. तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप केल्याचे प्रकरण त्रिसदस्यीय अहवालानंतर ‘दैनिक समय सारथी’ ने उजेडात आणत पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश मिळाले होते.देवानंद रोचकरी यांच्यासह इतरांवर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद आहे
रोचकरी यांना अटक करण्यासाठी उस्मानाबाद पोलिसांनी अनेक प्रयत्न केले, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने रोचकरी यांच्या घरी जाऊन तपास करीत झडती घेतली मात्र ते घरात आढळून आले नव्हते. दरम्यान मंकावती प्रकरण नंतर अनेक तक्रारी समोर येत आहेत. रोचकरी यांच्यावर आजवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून पोलीस त्याची जंत्री जमा करीत आहेत. देवानंद रोचकरी यांच्यावर दाखल गुन्ह्याचा इतिहास मोठा असुन हद्दपार कार्यवाहीसह एका गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुद्धा झाली असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना कार्यलयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला होता , त्या प्रकरणात रोचकरी हे जामीनावर आहेत.
तुळजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील तसेच जुने बसस्थानकसमोरील देवानंद रोचकरी यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवावे व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे कायदा विभागाचे तालुका कार्याध्यक्ष ऍड जनक धनंजयराव कदम- पाटील, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम परमेश्वर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या दोन्ही सरकारी जागा बळकावण्याच्या हेतूने रोचकरी यांनी भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बोगस कागदपत्रे बनविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.
तुळजापूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी अनेक पुरातन ऐतिहासिक वास्तू असून त्या भूमाफियांनी बनावट कागदपत्रे करून हडप केल्या आहेत त्या महसुल व नगर परिषद प्रशासन ताब्यात घेऊन भूमाफियांच्या मुसक्या आवळणार का हे पाहावे लागेल.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा १९०४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व तुळजापूर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सदर जागी अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे चार मुद्दे आदेशित केले होते त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.