कलम 467 समाविष्ठ – भुमी अभिलेख कार्यालयातील सहभाग कोणाचा ?
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना तुळजापूर तालुका कोर्टाने आज पुन्हा एकदा एक दिवसांची उद्या पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मंकावती गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून रोचकरी यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी व ते या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करीत नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.
देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट रोजी अटक झाल्यावर त्यांना 19 ऑगस्ट रोजी कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती, ती संपल्यावर आज दोघांना कोर्टात हजर करण्यात आले यावेळी पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती मात्र कोर्टाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट कागदपत्रे प्रकरणी रोचकरी यांना भूमी अभिलेख कार्यालयातील कोण कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली ? कट कसा रचला व त्यात सहभागी लोकांची नावे निष्पन्न करण्यासाठी व यासाठी वापरलेले शिक्के व इतर कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत.
कलमात वाढ झाल्याने अडचण वाढणार
रोचकरी यांच्यावर पूर्वी तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र त्यात आता कलम 467 हे वाढविण्यात आले आहे. देवानंद साहेबराव रोचकरी व बाळासाहेब रोचकरी यांनी भुमी अभिलेख कार्यलयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून अथवा त्यांच्यावर दबाव आणून बनावट सह्या बनवाट शिक्के तयार करून त्याआधारे मंकावती कुंडाची जागा बळकवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्याचे विरूध्द कलम 467 वाढवावे अशी विनंती पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी कोर्टात केली होती त्यानुसार हे कलम वाढविण्यात आले आहे.
‘हे’ म्हणणे पोलिसांनी कोर्टात मांडले
आरोपी हा शासकीय नौकराबद्दल राजकीय गुंडगिरीचे अधिकाराचा गैरवापर करून त्यांना ब्लॅकमेल करून त्याद्वारे गोरगरीब लोकांना फसवून त्यांचेकडून जमिनी व जागा भूखंड आपले नावे करून घेण्याच्या उद्देशाने त्यांची फसवणुक करण्याच्या सवयीचा आहे.त्या अनुषंगाने तो सर्व शासकीय कार्यालयात ये जा करून स्वतःच्या फायद्यासाठी विविध शासकीय कार्यालयाचे शिक्के बनविले असल्याची शक्यता आहे ते शिक्के घरात किंवा इतरत्र ठेवले असून ते हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडी दयावी तसेच आरोपी हे गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करीत नसल्याचे लेखी म्हणणे पोलिसांनी कोर्टात मांडले होते.
रोचकरी यांच्या गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर
देवानंद रोचकरी यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली आजवर तब्बल 35 गुन्हे नोंद असुन त्यातील अनेक गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत असे पोलिसांनी कोर्टात अहवाल दिला आहे तसेच नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यलयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला होता , त्या प्रकरणात रोचकरी हे जामीनावर आहेत. रोचकरी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांनी कोर्टात मांडली आहे. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे गुन्हे पूर्वी नोंद आहेत.