उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या जामीन अर्जावर सोमवारी उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.रोचकरी बंधू हे सध्या उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात आहेत, सोमवारी होणाऱ्या सूनवणीकडे लक्ष लागले आहे.
रोचकरी बंधू यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यां दोघांची तब्येत बिघडल्याने उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट केले होते त्यातही बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या असून शेवटी यात एका मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्याची सूत्रांची माहिती आहे.
तुळजापूर तालुका कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर रोचकरी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने रोचकरी बंधू यांची उस्मानाबाद जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 6 दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर रोचकरी बंधू यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.रोचकरी यांना यापूर्वी कोर्टाने 1 वर्षाची शिक्षा दिल्याचे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे मत नोंदवत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट रोजी अटक झाल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला आहे .
बनावट कागदपत्रे प्रकरणी रोचकरी यांना भूमी अभिलेख कार्यालयातील कोण कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली ? कट कसा रचला व त्यात सहभागी कोण? याचा तपास सुरू असुन ती नावे गुलदस्त्यातच आहेत.