तत्कालीन भुमी अधिक्षक पंडीत डोईफोडे यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे लक्ष, संचिका मागवली
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे देवानंद रोचकरी यांच्या प्रतापाच्या आणखी तक्रारी
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली असुन 6 सप्टेंबर रोजी सोमवारी जामीनावर फैसला होणार आहे. देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट अटक झाल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते उस्मानाबाद जेलमध्ये आहेत. कोर्टात सुनावणी दरम्यान रोचकरी यांनी कश्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने नोंद घेतली, त्यांच्यावर आजवर दाखल असलेल्या 35 गुन्ह्यांचा इतिहास, वंशावळ यासह अन्य बाजु न्यायाल्यासमोर मांडण्यात आल्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या स्थगिती आदेश नंतर रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर केलेल्या आनंदोत्सव व इतर बाबी समोर आल्या आहेत त्यामुळे सोमवारी काय निकाल येतो याकडे लक्ष लागले आहे.जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही भूमी अभिलेख कार्यालय व पुरातत्व विभाग या प्रकरणात मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे या दोन्ही विभागाची कारवाई अद्याप प्रलंबीत आहे. दरम्यान तुळजापूर येथील तत्कालीन तालुका भुमी अधिक्षक पंडीत डोईफोडे यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात खुद्द पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी लक्ष घातले असुन या आत्महत्या प्रकरणाची पडद्यामागील कारणे व अज्ञात आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रौशन यांनी डोईफोडे आत्महत्या प्रकरणाच्या गुन्ह्याची फाईल व त्याची तपासाची स्तिथी संचिका मागवुन घेतली आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे देवानंद रोचकरी यांनी इतर जमीन हडप केल्याच्या प्रतापाच्या आणखी तक्रारी दाखल झाल्या असुन यावर काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे.
देवानंद रोचकरी यांनी नगर विकास मंत्र्यांकडे दिलेल्या लेखी म्हणणेनुसार या कुंडाची मालकी शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांची असून ही त्यांची सातवी पिढी आहे, असे असताना आजवरच्या अन्य वारसांची नोंद वारसाहक्काने न घेता थेट या रोचकरी यांच्या वडीलांची नोंद तुळजापूर भुमी अभिलेख कार्यालयाने घेतल्याने कुंड हडप करण्याचा हेतू स्पष्ट झाला असुन अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. तुळजापूर भुमी अभिलेख कार्यालयातील अनेक कागदपत्रात हेराफेरी झाली असून या कार्यालयातील तालुका भुमी अधीक्षक पंडीत डोईफोडे या अधिकाऱ्यांने कार्यालयातील सहकारी कर्मचारी यांची नावे लिहून आत्महत्या सुद्धा केली आहे तर रोचकरी प्रकरणातील एक संबंधीत महिला कर्मचारी गंभीर आजाराने मयत झाली आहे. एक मयत तर एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर मोठी अडचण झाली आहे. आत्महत्या व तिर्थकुंड हडप अशा दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध आहे का ? याचा तपास पोलीस घेत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील इतर आरोपी व वेगवेगळ्या वंशावळी यासह अन्य बाबींचा तपास पोलिस करीत आहेत.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला आहे .
मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला होता. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढी ची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे असे म्हणटले होते.शेटीबा मंकावतीराव यांच्या नंतर अनेक वारस असताना अन्य वारसांना त्यांच्या हक्कापासून वगळून थेट देवानंद रोचकरी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप ऍड कदम यांनी केला.