धाराशिव – समय सारथी
2047 साली भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार असून, त्या विशेष क्षणी विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “विकसित महाराष्ट्र 2047” असे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे ठरविले आहे. या रणनीतिक आराखड्यात राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा आखली जाणार असून, धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा या आराखड्याच्या रचनात्मक प्रक्रियेत समाविष्ट केल्या जातील, त्यामुळे या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशांच्या रहाणीमानाचा दर्जा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व उपजीविकेच्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण आयोजित केले आहे. सर्वेक्षणात नागरिकांना 7 सोपे प्रश्न विचारले जातील, जिथे ते पर्याय निवडू, आपले विचार लिहू किंवा आवाज रेकॉर्ड करू शकतील. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश 2047 साली धाराशिव जिल्हा कसा असावा या विषयावर लोकांच्या मूल्यवान अपेक्षा आणि मते संकलित करून, विकास आराखड्यात त्यांना प्रतिबिंबित करणे आहे.
“विकसित महाराष्ट्र 2047” हा आराखडा तयार करताना राज्याच्या प्रत्येक स्तरावर लोकांच्या मते समाविष्ट करणे गरजेचे आहे. या दिशेने धाराशिव जिल्ह्याच्या नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की, स्थानिक संघटना, पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या सर्वसमावेशक सहभागाने हा प्रकल्प अधिक मजबूत, समृद्ध आणि सर्वांगीण विकासाचा दिशादर्शक बनेल.आपल्या प्रत्येक मताचे महत्त्व आहे. आपले मते आणि अपेक्षा धाराशिव जिल्ह्याच्या विकास आराखड्यात प्रतिबिंबित होऊन महाराष्ट्राच्या भविष्याचे स्वप्न साकार करण्यास मदत करतील.
महाराष्ट्र शासनाने सर्व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करणे किंवा QR कोड स्कॅन करणे पुरेसे आहे. https://wa.link/09359m