धाराशिव – समय सारथी
बोगस पीक विमा घोटाळ्याचे रॅकेट राज्यभर असुन त्याचा केंद्रबिंदु परळी येथे आहे. कृषी आयुक्त कार्यालयासह राज्यातील अधिकारी यांनी पीक विमासह टेंडर यात मोठा घोटाळा केला असुन त्याची तक्रार आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. ते अधिकारी रडारवर असुन धाराशिवची पीक विमा घोटाळा चौकशी थांबली आहे, त्यात बोगस शेतकऱ्यांना आरोपी करा अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे.
कृषी आयुक्तालय कार्यालयात काही अधिकारी 10 ते 20 वर्षांपासुन तळ ठोकून आहेत, विनय आवटे नावाचा एक अधिकारी असुन ते फक्त पीक विमा बाबत काम पाहतात, ते सोडून इतर कोणता अधिकारी सक्षम नाही का? असा प्रश्न त्यांनी केला. पीक विमा कंपनी, हवामान अंदाज यासाठीच्या कंपन्या यांचे साटेलोटे करुन फक्त विमा कंपनी यांचा फायदा कसा होईल हे आवटे नावाचे अधिकारी पाहतात. 400 कोटी रुपयांची काही ऑफ लाईन खरेदी झाली आहे, त्यात काही लोक दोषी आहेत. शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा विमा कंपन्याना फायदा करुन दिला गेला असा आरोप आमदार धस यांनी केला.
1 रुपयांचा पीक विमा झाला तेव्हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगस पीक विमा भरण्याचे प्रकार घडले आहेत, अश्या सर्वांच्या विरोधात मी तक्रारी केल्या आहेत. 56 पानी तक्रार पत्र दिले असुन त्या अधिकारी यांच्या चौकशी झाली पाहिजे. 78 कंपन्या ह्या कृषी विभागातील अधिकारी यांच्याशी संबंधित असुन बायको, मुलगा व इतर नातेवाईक यांच्या नावाने कंपनी काढल्या आहेत. एमएआयडीसीचा फायदा घेतला गेला. याचं कंपनी यांनी माल तयार करायचा व लिंकिंगच्या माध्यमातून ह्याच्या बरोबर हे घ्या नाहीतर खत मिळणार नाही अशी सक्ती केली जाते, इतकी मुजोरी या कृषी खात्यातील अधिकारी यांची झाली आहे, त्या विरोधात तक्रार दिली असुन त्यांच्यावर कारवाई झाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे आमदार धस म्हणाले.
डीबीटी पद्धत थांबवून ऑफ लाईन पद्धतीने खरेदी करण्यात आली, 3 टेंडर आले नाही तर रिकॉल करावे लागते मात्र कृषी विभागात 2 कंपनीचे टेंडर आले व त्याच्या आधारे कृषी पंप खरेदी करण्यात आले. एकाच व्यक्तीच्या नावाने 4 कंपनी दाखवून टेंडर देण्यात आले. पर्जन्य मापक यंत्र काही ठिकाणी फोडण्यात आले, पीक विमा कंपनी कडुन हप्ते घेण्यात आले. विमा कंपनीचा पैसा काही अधिकारी यांनी स्वतःच्या खात्यावर घेतला, तो शेअर बाजार व इतर ठिकाणी गुंतवला व नफा कमावला असा आरोपी धस यांनी केला.
धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेडसह राज्यात अनेक ठिकाणी बोगस पीक विमा भरल्याचे प्रकार समोर आले. परळी येथून काही सेंटर चालवले जातात तिथून शासकीय मालकी, गायरान जमिनी, वन खाते, कॅनल, शासकीय रस्ते, प्रकल्प संपादित जमिनीवर पीक विमा भरून करोडो रुपये लुटले जात आहेत. चक्क उत्तर प्रदेशातील शेतकरी यांनी नांदेड येथे पीक विमा भरला आहे. धाराशिव येथे 565 शेतकऱ्यांच्या नावे शासकीय जमिनीवर पीक विमा भरला गेला, त्यात 23 सेंटर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला, यात जे शेतकरी आहेत ते तत्कालीन कृषी मंत्री यांच्या परळी तालुक्यातील आहेत. परभणी, हिंगोली या ठिकाणी परळी येथील शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. फसवणूक झाली नाही असे काही पोलीस अधिकारी सांगतात मात्र फसवणूक करण्यासाठी कट रचून त्यांनी हे कृत्य केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवुन 565 शेतकऱ्यांनी 1 हजार 170 अर्जाद्वारे ऑनलाईन पीक विमा काढला होता. 565 पैकी तब्बल 454 शेतकरी हे एकट्या बीड जिल्ह्यातील असुन 37 शेतकरी लातुर, 14 धाराशिव जिल्ह्यातील आहेत. यातील बोगस शेतकरी हे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, कर्नाटक राज्यातील बिदर, लातुर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, सातारा, सोलापूर या 14 जिल्ह्यातील आहेत. 24 केंद्र चालक पैकी 16 आरोपी परळी तालुका व हेळंब गाव बीड जिल्ह्यातील आहेत. 3 कोटी रुपयांचा हप्ता सरकारने भरला त्याच्या बदल्यात 15 कोटी येणार होते म्हणजे 18 कोटी रुपये ह्या बोगस शेतकऱ्यांच्या नावाने जाणार होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने व त्यांच्या टीमने या प्रकरणाची व प्रत्येक अर्जाची चौकशी केली त्यानंतर कृषी उप संचालक बाबासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 एप्रिल 2024 गुन्हा नोंद केला.
धाराशिवची चौकशी थांबली आहे, केवळ केंद्र चालकावर गुन्हा नोंद होऊन चालणार नाही, जे डुप्लिकेट शेतकरी आहेत त्याच्या नावाने विमा भरला त्यांनाही आरोपी करावे अशी मागणी आमदार धस यांनी केली. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे व जेलमध्ये असलेले आका वाक्मिक कराड हे कुठूनही बोगस शेतकरी आणुन विमा भरू शकतात. राज्यभर जिथे चुकीचे प्रकार झाले आहेत तिथे गुन्हे नोंद झाले पाहिजेत, धाराशिव चौकशी व राज्यभर गुन्हे नोंद करावे यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.