धाराशिव – समय सारथी
नवीन वीज कनेक्शनसाठी 6 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यास धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. खटी यांनी दोषी ठरवत 4 वर्षांची सक्त मजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास 9 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी या खटल्यात बाजु मांडली त्यानंतर कोर्टाने पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून शिक्षा सुनावली.
आरोपी प्रदीप काकासाहेब साठे, (रा. विवेकानंद नगर, तुळजापूर, मूळ रा. काळंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव) हा महावितरण कंपनीत तांत्रिक पदावर तुळजापूर ग्रामीण-१ (पाचुंदा) येथे कार्यरत होता. 7 जानेवारी 2017 रोजी त्यांनी फिर्यादी योगेश बळिराम कानडे यांच्याकडून त्यांच्या वहिनीच्या नावे वीज कनेक्शनसाठी लागणाऱ्या सर्वे रिपोर्टासाठी 6 हजार रुपयांची मागणी केली होती.16 जानेवारी, ही लाच रक्कम पंचांसमक्ष आरोपीच्या सहकाऱ्याच्या मार्फत स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7,13(1)(ड),13(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी. जी. आघाव यांनी पूर्ण केला होता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. अभियोग पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड महेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यांनी सादर केलेल्या 4 साक्षीदारांच्या साक्षी व युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.