धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 50 वर्षीय नराधम आरोपी धर्मराज मारुती कचरे यास धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारच्या वतीने सरकारी वकील ऍड सचिन सूर्यवंशी यांनी बाजु मांडली. सुनावणी दरम्यान समोर आलेले पुरावे व युक्तिवाद ऐकून कोर्टाने आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
बाळाच्या आईने रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर आरोपी पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडूण ठेवले, त्यांची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणात 9 साक्षीदार तपासण्यात आले, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी तपास करुन पुरावे गोळा केले व कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. वैद्यकीय पुरावे, मुलीच्या आईसह इतर साक्षीदार यांची कोर्टातील साक्ष व पुरावे यात महत्वाचे ठरले. आरोपी विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात 2019 साली बाललैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती अत्याचार अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.पैरवी अधिकारी म्हणुन महिला पोहेकॉ कोठावळे यांनी काम पाहिले.












