मंकावती तिर्थकुंड अखेर सरकारचे, नोंदी रद्द करा – भुमी अभिलेख कार्यालयाचा निकाल
घोटाळेबाज अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी , अनेक कागदपत्रे गहाळ तर चुकीच्या अनेक नोंदी
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील बहुचर्चित तुळजाभवानी देवीचे विष्णुतीर्थ म्हणजेच मंकावती तिर्थकुंड हे राज्य सरकारच्या मालकीचे असुन त्याची मिळकत पत्रिका पुनर्गठीत करून तुळजापूर नगर परिषदच्या देखरेखीखाली महाराष्ट्र शासनाची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख स्वाती लोंढे यांनी त्यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणी अंती दिले आहेत. या मंकावती तिर्थकुंडच्या मालकीची सुनावणी भुमी अभिलेख यांच्या कोर्टात घेण्यात आली त्यात हा निकाल दिला तर देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू साहेबराव रोचकरी यांच्या नावे अनधिकृतपणे मिळकत पत्रिका तयार करणारे तत्कालीन कर्मचारी,अनधिकृतपणे अभिलेखाचे नकला तयार करणारे, तपासणी व वितरण करणारे कर्मचारी यांच्यावर नियमानुसार तुळजापूर उपअधीक्षक भुमी अभिलेख यांनी विभागीय चौकशीची कार्यवाही करून अहवाल सादर करावा यासह रोचकरी यांच्या नावे अनधिकृत करण्यात आलेली मिळकत पत्रिका, नोंदवही उतारा, सनद रद्द केली आहे त्यामुळे रोचकरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.लोंढे यांनी त्यांच्या निकालात कर्मचारी यांची नावे मात्र नमुद केली नाहीत.लोंढे यांच्या निकालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
दरम्यान रोचकरी यांना बंधूंना 18 ऑगस्ट रोजी मुंबई येथुनअटक झाल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते 24 ऑगस्टपासुन उस्मानाबाद जेलमध्ये आहेत. तुळजापूर तालुका व उस्मानाबाद कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला असल्याने ते गेल्या 1 महिन्यापासुन उस्मानाबाद जेलमध्ये मुक्कामी आहेत. मंकावती कुंडाचे मालकी जागेवर महाराष्ट्र सरकारने नाव लावावे यासाठी तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी भुमी अभिलेख अधीक्षक यांच्या कार्यालयात अपील केले होते या प्रकरणात रोचकरी यांच्या वकिलांनी 2 वेळेस मुदतवाढ देऊनही कोणतीही अभिलेख दिले नाहीत. रोचकरी यांनी तयार केलेल्या फेरफारवर तत्कालीन भुमी उपअधीक्षक यांनी सही केली नसल्याचे समोर आले. तुळजापूर नगर परिषद व जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीतील अनेक मुद्देसह अन्य बाबी यात समोर आल्या आहेत.नगर परिषदेच्या वतीने मिळकत व्यवस्थापक शिवरत्न आतकरे यांनी यांनी प्रतिनिधी म्हणून बाजू मंडली.मंकावती तिर्थकुंड बाबत तुळजापूर उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयात मिळकत पत्रिकेचा शोध घेतली ती सापडली नाही.या प्रकरणात 7 सप्टेंबर व 15 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली व त्यांनतर निकाल दिला गेला.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. मंकावती या भव्य तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी करून स्पष्ट झाले आहे. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे हे आता चौकशी समितीनंतर निकालात स्पष्ट झाले आहे
गुन्ह्याचा इतिहास तर प्रकरण उच्च न्यायलायत
रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला होता तसेच नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यलयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
देवानंद रोचकरी यांची मंत्र्यासमोर बाजू –
मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला होता. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढी ची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे असे म्हणटले होते. शेटीबा मंकावतीराव यांच्या नंतर अनेक वारस असताना अन्य वारसांना त्यांच्या हक्कापासून वगळून थेट देवानंद रोचकरी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप ऍड कदम यांनी केला.