वैद्यकीय क्षेत्राला काळिमा – आर्थिक लूट व चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय सेवा दिल्याचा डॉ शेंडगेवर गंभीर ठपका
लालफितीचा कारभार, अनेक पाठीराखे – 7 महिने उलटले तरी कारवाई नाही
रुग्णालयाची परवानगी व योजना रद्द करण्याची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांची शिफारस
एकच बनावट तपासणी रिपोर्ट जोडून वेगवेगळ्या रुग्णाचे इन्शुरन्स पॅकेज घेणे व ब्लड रिपोर्ट बदलणे
रुग्ण कृत्रीम श्वसन यंत्रणेवर असल्याचे भासवून जादा रकमेचे पॅकेज घेणे व त्याला सामान्य वॉर्डात ठेवणे
उस्मानाबाद – समय सारथी
बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णाची फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील डॉ शेंडगे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ शेंडगे रुग्णालयाची परवानगी व योजना रद्द करण्याची जिल्हाधिकारी दिवेगावकरांनी शिफारस करून 7 महिने उलटले तरी कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तर डॉ शेंडगे यांच्या कारवाईबाबत लालफितीचा कारभार पुन्हा एकदा समोर आला असुन त्यांना व अश्या काळिमा फासणाऱ्या कृत्यांना पाठीशी घालणारे पाठीराखे कोण ? याची चर्चा होऊ लागली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची संलग्नता रद्द करण्यासह रुग्णालयाची परवानगी रद्द करण्याची लेखी शिफारस उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्च 2021 मध्ये केली होती अद्याप त्यावर 7 महिने झाले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी ८ वेगवेगळ्या मुद्यात शेंडगे रुग्णालयाला आर्थिक लूट व चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देऊन रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. ज्यात सरकारी योजनेचा लाभ घेऊनही जादा बिल आकारणे , नियमात असतानाही उपचार नाकारणे, रक्तचाचणीचे लॅबचे अतिरिक्त बिल आकारणे, रुग्ण तात्पुरत्या स्वरूपाची कृत्रीम श्वसन यंत्रणेवर असल्याचे भासवून जादा रकमेचे पॅकेज घेणे व नंतर रुग्णाला सामान्य विभागात पाठविणे,एकच बनावट तपासणी रिपोर्ट जोडून (एबीजी) वेगवेगळ्या रुग्णाचे फुले योजने अंतर्गत इन्शुरन्स पॅकेज घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणे याचा समावेश आहे.
शेंडगे रुग्णालयात रुग्णांवर उपचाराच्या नावाखाली सुरु असलेल्या आर्थिक लुटीसह अनेक गैरप्रकाराचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्य सरकारकडे केली आहे. तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याने सेवास्तर करारनुसार रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांनी केली आहे. अनेक रुग्णांनी केलेल्या तक्रारी व महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना आणि एम डी इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी लेखी अहवाल लिहला आहे.
रुग्ण सरोजाबाई बळीराम कांबळे या रुग्णाला आयसीयूमध्ये ऍडमिट केल्याचे भासवून योजनेतून पैसे लाटले. रुग्ण याकूब आलुरे यांच्याकडून योजनेतून उपचार देऊनही त्यांच्याकडून १२ हजार १८० रुपये अतिरिक्त आकारले तसेच रुग्ण सुलताना सैफन शेख यांच्याकडून ४० हजार व रुग्ण विजय भीमा जाधव यांना योजनेत उपचार देऊन सरकारकडून पैसे घेतले व रुग्णाकडून ९२ हजार घेतले. शेंडगे रुग्णालयाचे हे कृत्य महात्मा फुले योजनेच्या कलम ६.१ , ६.२ , २७. १ (सेवा स्तर करार) यांचे उल्लंघन असल्याचा अहवाल दिला आहे.
शेंडगे रुग्णालयाने एकाच प्रकारची चूक वारंवार केली असल्याचे निदर्शनास आले असल्याने या रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची संलग्नता रद्द करणे व रुग्णालया ाविरुद्ध तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे त्यानुसार रुग्णालयााचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा २००६ अंतर्गत परवाना रद्द करणे यासाठी कार्यवाहीची शिफारस जिल्हाधिकारी तथा फुले योजनेचे जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.