धाराशिव – समय सारथी
धाराशिवसह राज्यातील भाविकांसाठी आनंदाची बातमी असुन 1 हजार 800 कोटी रुपयांच्या तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा विकासाचा विषय यामुळे मार्गी लागणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर आणि परिसराचा कायापालट होणार असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुती सरकारचे तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत.
गेल्या अनेक वर्षाच्या मागणीला, पाठपुराव्याला यश मिळाले असुन ठाकरे सरकारच्या काळात दुर्दैवाने यासाठी काही सहकार्य मिळाले नाही. भाजप महायुती सरकार आल्यावर याला गती मिळाली असुन शिखर समितीने मान्यता दिली आहे. भाविकांच्या सुविधेवर भर दिला जाणार असुन ज्यांची जागा संपादित करण्यात येणार आहे त्यांना योग्य मावेजा देण्यात येणार आहे. येत्या 3 वर्षात ही कामे करण्यात येणार असुन जीर्णोद्धाराचे काम 6 महिन्यापुर्वीच सुरु केले आहे असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा तुळजापूर येथे आले तेव्हा त्यांनी आराखडा सादरीकरण पाहिले व सगळ्या बाबी समजुन घेतल्या. त्यांनी काही सुचना केल्या की आगामी 500 वर्ष मंदिराला काही होणार नाही, त्या पद्धतीने काम होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे काम केले जाणार आहे. आजचा दिवस आनंदाचा असुन ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आमदार पाटील यांनी आभार मानले.