शेतकऱ्यांना दिलासा , दिवाळीपुर्वी मदत खात्यावर जमा होणार – 237 कोटींची राज्याकडून मदत
पाठपुराव्याला यश – आमदार कैलास पाटील यांनी मानले सरकारचे आभार
राज्याने दिले आता केंद्र सरकारच्या मदतीकडे लक्ष ? शेतकऱ्यांना आधाराची गरज
उस्मानाबाद – समय सारथी
ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 237 कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. उद्यापासुन या मदतीचे वितरण सुरू होणार असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम दिवाळीपुर्वी जमा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही मदत दिल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार डॉ तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आले असुन शेतकऱ्यांना या मदतीने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने निकषाबाहेर जाऊन 316 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती यातील 75 टक्के म्हणजेच 237 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्याचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 217 कोटी रुपयांची मदत देय होती, त्यात राज्य शासनाने 99 कोटी 46 लाख रुपयांच्या वाढीव निधीची भर घातली आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील 4 लाख 55 हजार 406 शेतकरी मदत मिळणार आहे. यातील 237 कोटी 60 लाख रुपये निधी वितरणास लागलीच सुरुवात होत आहे. ठाकरे सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना मदत देण्याचा शब्द पाळला आहे असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने मदत केली आता केंद्र सरकार केव्हा आणि किती मदत करेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, त्याच बरोबर पीक विमाही मिळणे गरजेचे असुन त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करावा गरजेचा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 लाख 42 हजार 545 शेतकऱ्यांचे 3 लाख 5 हजार हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले तर 10 हजार 231 शेतकऱ्यांचे 5 हजार 475 हेकटर बागायत क्षेत्राचे नुकसान झाले. 2 हजार 630 शेतकऱ्यांचे 1 हजार 119 हेकटर बहुवार्षिक क्षेत्राचे नुकसान झाले अशा प्रकारे 4 लाख 55 हजार 406 शेतकऱ्यांचे 3 लाख 12 हजार 407 हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले.