धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील ड्रग्ज प्रकरणात मी आरोपीना कसे सहीसलामत बाहेर काढले , माझ्या लांबपर्यंत ओळखी आहेत, परंडा प्रमाणे तुम्हालाही सोडवतो असा दावा एका वकीलाने तुळजापूर ड्रग्ज तस्करी काही अटक आरोपीकडे केला आहे. या प्रकरणाची कोर्टातील वकीलात व धाराशिव येथील कारागृहात मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे त्या वकीलाकडे परंडा येथील आरोपीचे वकीलपत्रही नव्हते, मात्र मॅनेज केल्याचे दावे केले जात आहेत. या चर्चेनंतर चाललंय तरी काय ? हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. ड्रग्ज सारख्या सामाजिक विषयात असे पोकळ दावे व प्रॅक्टिस कितपत योग्य आहे, याचा विचार होणेही गरजेचे आहे. केसेस मिळवण्यासाठी मॅनेजमेंट करीत असल्याचे वेगवेगळे फंडे सध्या काही मंडळीकडुन सर्रास वापरले जात असुन त्यातील हा एक प्रकार असुन शकतो. मात्र यामुळे परंडा प्रकरणात खरेच असे काही झाले का हा प्रश्न समोर आला आहे. परंडा प्रकरणात अगोदरच अनेक प्रश्न उपस्थितीत होत असताना या एका वकीलाच्या दाव्याने संभ्रम वाढवला आहे. एखाद्या आरोपीचा वकीलाशी झालेल्या संवादाची गुप्तता असते, काही आरोपी वरील दाव्याची खुलेआम चर्चा करीत आहेत.
परंडा शहरात पोलिसांनी 19 जानेवारी 2024 मध्ये कारवाई करीत ड्रग्ज जप्त करीत या गुन्ह्यात 6 महिन्याच्या तपासानंतर इम्रान नसिर शेख व अन्वर उर्फ अण्णा अत्तार या 2 आरोपीना अटक केली.जप्त केलेले 8.33 ग्रॅम हे ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गुन्ह्याची फिर्याद गैरसमजुतीतुन दिल्याने गुन्हा रद्द करावा यासाठी ‘क’ समरी कोर्टात मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. भुम उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत 19 मार्च 2025 रोजी परंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यावर फिर्यादीला समन्स पाठवण्यात आले असुन 24 एप्रिल रोजी परंडा कोर्टात सुनावणी होणार आहे.