गौरी कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा – 27 नृत्यांगणांसह 36 ग्राहकांवर गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील गौरी कलाकेंद्रावर पोलिसांनी छापा मारला असून 27 नृत्यांगणांसह 36 ग्राहकांवर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोविड संदर्भात जारी मनाई आदेशांचे उल्लंघनसह् अन्य कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. नववर्षाच्या अगोदर हा छापा पडल्याने खळबळ उडाली आहे.
सध्या कोविड- 19 च्या ओमायक्रोन प्रसारास प्रतिबंध होण्यासाठी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. या पार्श्वभुमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब येथील पथक वडगाव शिवारात रात्रगस्तीस असतांना त्यांनी गौरी कलाकेंद्रास भेट दिली. यावेळी कलाकेंद्र मालक मनसुर नुर शेख, रा. लातूर यांनी कलाकेंद्रात 27 नृत्यांगणांसह 36 पुरुष एकत्र जमवून नृत्यांगणा नृत्याद्वारे अश्लिल, बिभत्स हावभाव करत असल्याचे आढळले तर सुरज राजेश निकाळजे रा. जामखेड हे तेथे मद्यपुरवठा करत असल्याचे आढळले. यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब येथील पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 188, 268, 269, 294, 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 33, 131 सह साथीचे रोग अधिनियम कलम- 3 व महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास करित आहे.