कोरोनाचा उद्रेक – शनिवारी उस्मानाबादेत 66 रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने शुक्रवारी व शनिवारी असे सलग 2 दिवस उद्रेक केला असून बऱ्याच दिवसानंतर मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. शनिवारी 66 रुग्ण सापडले तर शुक्रवारी 80 रुग्ण सापडले आहेत. नमुने तपासणीत रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण शुक्रवारी 2.90 टक्के होते मात्र हे प्रमाण शनिवारी 4.24 टक्के म्हणजे जवळपास दुप्पट राहिले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 20 रुग्न सापडले आहेत तर परांडा तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. शनिवारी 1 हजार 556 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 66 म्हणजे 4.24 टक्के नमुने पॉझिटीव्ह आले. शनिवारी 66 रुग्ण सापडले असून 20 जण उपचार नंतर बरे झाले आहेत तर जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 292 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी 66 रुग्ण सापडले त्यात तुळजापूर 14, उमरगा 2, लोहारा 4, कळंब 18, वाशी 2 व भूम तालुक्यात 6 रुग्ण सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 68 हजार 75 रुग्ण सापडले त्यापैकी 65 हजार 702 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.76 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 1 हजार 509 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.22 टक्के आहे.
चार दिवसात 4 पट रुग्णवाढ चिंताजनक
रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे दिवसेदिवस वाढत असून गेल्या 4 दिवसात हे प्रमाण चार पटीने वाढले आहे. 31 डिसेंबर रोजी 9, नवीन वर्षी 1 जानेवारील 21, 2 जानेवारी 2, 3 जानेवारी 18, 4 जानेवारी 35, 5 जानेवारी 40, 6 जानेवारी 23, 7 जानेवारीला तब्बल 80 रुग्ण सापडले तर शनिवारी 66 रुग्ण सापडले.
जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन दक्ष व सज्ज झाले आहे. महसूल व पोलीस यंत्रणाही कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी व प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयात 5 हजार 445 बेडस तयार करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 1 हजार 65 बेड उपलब्ध आहेत. 1 हजार 400 ऑक्सिजन बेड, 183 व्हेंटिलेटर, 199 आयसीयू बेडची गरजेनुसार उपलब्धता करण्यात येणार आहे तर खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात 52.44 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होणार असून 12.14 मेट्रिक टन ऑक्सिजन हा हवेतून जमा करून सिलेंडरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.