थेट भुमिका – संसदेत आवाज उठवणार, आंदोलनाचा इशारा
धाराशिव – समय सारथी
एमडी ड्रग्सची वाहतूक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर तात्काळ कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. तरुण नशेच्या आहरी गेल्याचे मी स्वतः तुळजापूरला गेल्यावर पाहिले आहे. ड्रग्ज माफिया व तस्करी याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, प्रशासनाला निवेदन दिले आहे यावर काही कारवाई न झाल्यास संसदेत आवाज उठवण्यासोबतच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे. पोलिसांनी कोणाचीही गय नं करता या रॅकेटमधील दोषी आरोपीना अटक करावी, आपण यात सातत्याने लक्ष ठेवुन आहोत असेही ते म्हणाले.
धाराशिव जिल्हयातील परांडा व तुळजापुर तालुक्यात मोठया प्रमाणात एमडी ड्रग्सची वाहतुक व विक्री होत असून जिल्हयातील विशेषतः तरुण वर्ग या आमली पदार्थाच्या आहरी गेला असल्याने त्यांच्या आरोग्यावर घातक परीणाम होत आहे. तरुण पिढी या आमली पदार्थाच्या सेवनामुळे उध्दस्त होत आहे. तामलवाडी येथे पोलीसांनी कारवाई केली ही कौतुकास्पद बाब असून यापुढेही देखील अशाच प्रकारे एमडी ड्रग्सची होणारी वाहतुक व विक्री यावर बंदोबस्त करावा. गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेगवेगळया तुकडयांचा नेमणुका करुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.