जामीनाची सुनावणी उद्या होणार, ठेवीदारांचे लक्ष – वसंतदादा बँकेचे चेअरमन व संचालकांचा करोडोचा घोटाळा
धाराशिव : समय सारथी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेने करोडो रुपयांचा गंडा ठेवीदारांना घातला असुन या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते यांच्यासह संचालक मंडळाच्या अटकपुर्व जामिनीवर गुरुवारी सुनावणी न झाल्याने उद्या शुक्रवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टात आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी कागदपत्रासह उपस्थितीत होते तर काही ठेवीदार यांनी कोर्टात हजेरी लावली. कोर्टाच्या निकालानंतर पुढील तपास व अटकेची दिशा ठरणार आहे. ठेवीदार व कर्जदार यांचे डोळे निकालाकडे लागले आहेत.
दंडनाईक यांनी पतसंस्था, दूध संघ यांच्यासह साखर कारखाना बुडविला असुन त्यातून शेतकरी व लोकांना करोडोचा गंडा घातला आहे. ते घोटाळेही यानिमित्ताने चर्चेला आले असुन तपास यंत्रणाच्या रडारवर आले आहेत. अनेक जणांचे सातबारे विश्वासाने घेऊन त्यावर लाखों रुपयांचे कर्ज घेऊन विश्वासाने गळा कापला. कर्जाच्या नोटीसा आल्याने धास्तीने अनेकांचा जीव घेतला तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ करीत आहेत. ठेवीदार संरक्षण कलम लागल्याने चेअरमन यांच्यासह काही जणांची जेलवारी निश्चित मानली जात आहे. बँक बुडविल्याने अनेक ठेवीदार व कर्जदार यांचे संसार यामुळे उघड्यावर आले आहेत.
तत्कालीन संचालकामध्ये सीए असलेले भीमराव ताम्हाणे, प्रसिद्ध वकील अॅड. दयानंद बिराजदार, इंजिनियर प्रदीप मुंडे यासह सुरेखा विजय उर्फ विजयकुमार दंडनाईक, महादेव श्रीपती गव्हाणे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बाबूराव आकोसकर, विष्णूदास रामजीवन सारडा, पृथ्वीराज विजय दंडनाईक, रामलिंग धोंडीआप्पा करजखेडे, ईलाही फरीदसाब बागवान, हरिश्चंद्र पंढरीनाथ शेळके यांसह इतरांचा समावेश आहे. काही जणांनी कोर्टात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे त्यावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
दंडनाईक कॉम्प्लेक्समध्ये कागदोपत्री अनेक उद्योग थाटले गेले व ते सुरु असल्याचे दाखवत कर्ज लाटले.एकप्रकारे जणू दंडनाईक कॉम्प्लेक्स इथे कागदावर उद्योगनगरी स्थापन केली गेली असेच चित्र आहे. बोगस फर्मच्या नावाने कर्ज वाटप केले गेले तर आर्थिक लाभाचे धनी चेअरमन व त्यांचे निकटवर्तीय ठरले. बँक घोटाळा पचवण्यासाठी विजय दंडनाईक हे काँग्रेसमधुन भाजप वासीय झाल्याचेही बोलले जात आहे.
वसंतदादा बँकेचे चेअरमन, काही संचालक व कर्मचाऱ्यानी संगणमत करून कार्यकर्ते, नातेवाईक, त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे नावे बनावट फर्म बनवून पुरेशे तारण न घेता लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. काही कर्जदारांना तर लाखो रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. जवळच्या जवळपास 200 लोकांना लाखो रूपयांचे कर्ज वाटले. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम बचत खात्यावर जमा होताच, त्याच क्षणी व त्याच दिवशी चेअरमन दंडनाईक यांच्या बचत खात्यावर सर्व कर्जाची रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी दिसून आल्याने वसंतदादा बँकेचा बँकींग परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. परिणामी वसंतदादा बँकेचे मोठे ठेवीदार अडचणीत आले.