धाराशिव – समय सारथी
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पवार व डॉ पाटील कुटुंबाचे नाते व राजकीय संबंध हे फार जुने आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा निवडणुकीत महायुती भाजपकडुन उमेदवार आहेत. या काळात सुळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात असले आहेत. राजकारणापलीकडील कौटुंबिक नाते कायम असते हे सुळे यांनी दाखवून दिले.
तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा… अशी पोस्ट सुळे यांनी टाकली आहे. 1978 ला डॉ पद्मसिंह पाटील हे आमदार झाले त्या पुर्वीपासुन शरद पवार यांचे त्यांचे नाते राहिले आहे. पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्यावेळीही डॉ पाटील हे सोबत होते त्यांनी साथ सोडली नाही.
डॉ पाटील परिवार राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर कडाडुन टीकाही केली मात्र वाढदिवसाला शुभेच्छा देत कौटुंबीक, वयक्तिक कटुता नसुन राजकीय मतभेद असल्याचे दाखवून दिले. राजकारणापलीकडे दोन्ही परिवार एकच असाच संदेश दिला. तुळजापूर मतदार संघात महाविकास आघाडीकडुन काँग्रेसचे ऍड धीरज पाटील यांच्या नावाची घोषणा केली असुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडुन जीवनराव गोरे यांनीही पक्षाचा एबी फॉर्मसह अर्ज भरला आहे.