पोलीस कोठडी – तथाकथीत राष्ट्रसंत लोमटे महाराज यांना फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक
धाराशिव – समय सारथी
कळंब तालुक्यातील श्री दत्तमंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरचे तथाकथीत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना ग्राम पंचायत कार्यालयाची बनावट कागदपत्रे व बनावट शिक्के वापरून विकास कामाचा प्रस्ताव करुन शासनाला एक कोटी दहा लाख निधीचा गंडा घातल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली असुन कोर्टाने त्यांना 28 ऑगस्ट सोमवार पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पंचायत समितीने ग्रामसेवक,सरपंचावर गुन्हा दाखल केला व यामध्ये महीला सरपंचाला अटक झाली, या प्रकरणात पोलिसांनी एकनाथ लोमटे महाराजावर गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. बलात्काराच्या प्रकरणात अटक होऊन सुटका होताच त्यांना फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांनी जुन्याच झालेल्या कामावर नव्याने एक कोटी निधी आणल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतने हा निधी रद्द करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीला पत्र देवुन निधी रद्द केला होता. सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून गावातील सुंदर लोमटे यांनी येरमाळा पोलिसात तक्रार केली होती.चौकशीत पोलिसांनी तपास करुन अहवाल पंचायत समितीला सादर केला होता.सदर अहवालात ठरावातील सूचक,अनुमोदक,ग्राम सेवक,सरपंच यांच्या केलेल्या चौकशीत लोमटे महाराजांनी कागद पत्रांचा गैर वापर केल्याचे सांगूनही पंचायत समितीचे चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी टी.जे.जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच,रुक्मिणी आगतराव घोळवे व ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांच्यावर बनावट कागदपत्र,सही,शिक्के,बनावट ठराव तयार केल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पंचायत समितीच्या चौकशी अहवालात सदरील प्रकार एकनाथ लोमटे महाराजांनी केल्याचे जबाब असूनही गट विकास अधिकारी यांनी लोमटे महाराजांना अभय दिले होते मात्र अखेर तपास करुन त्यांना अटक केली आहे.
महिला भाविकांच्या विनयभंग प्रकरणात २८ जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर महाराज जामीनावर सुटले होते नंतर कोर्टाच्या आदेशानुसार एकनाथ लोमटे महाराजावर बलात्काराच्या आरोपात अटक करून न्यायलयीन कोठडी मिळाली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या लोमटे महाराजाला पुन्हा पोलिसांनी जिल्हा कारागृहातून बनावट कागदपत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुन्हा एका गुन्ह्यात अटक करुन धाराशिव न्यायालयात हजर केले आहे.