काँग्रेसची 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर – पाटील विरुद्ध पाटील लढत
धाराशिव – समय सारथी
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने 16 उमेदवार यांची तिसरी यादी जाहीर केली त्यात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी ऍड कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. माजी मंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण यांचा पत्ता वयाचे कारण पुढे करीत कट केला आहे, चव्हाण व अशोक जगदाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 5 वेळेस आमदार राहिलेले व एक वेळेस विधानसभा लढविलेल्या मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली नाही त्यांनी अर्ज भरत प्रचार सुद्धा सुरु केला होता.
काँग्रेसने त्यांची महाराष्ट्र राज्यातील पहिल्या 48 जणांच्या व दुसऱ्या 23 जणांची यादी जाहीर केली त्यात तुळजापूरचे नाव नव्हते मात्र तिसऱ्या 16 उमेदवार यांच्या यादीत तुळजापूर मतदार संघातुन धीरज कदम यांना उमेदवारी घोषित केली. काँग्रेसने आजवर 86 उमेदवार यांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडुन माजी मंत्री व आमदार मधुकरराव चव्हाण व जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विश्वास शिंदे इच्छुक होते त्यात कदम पाटील यांनी बाजी मारली. पाटील विरुद्ध पाटील अशी रंगतदार लढत इथे पहायला मिळणार आहे.
तुळजापूर मतदार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1978 व 1985 ची निवडणूक शेकापच्या माणिकराव खपले यांनी जिंकली. मात्र, उर्वरित काळात येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण 1990 साली पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंतच्या 20 वर्षाच्या काळात ते कायम आमदार राहिले. 2019 च्या निवडणुकीच्या आखाड्यात ते पराभूत झाले.
मधुकरराव चव्हाण हे 25 वर्ष आमदार राहिले व ते काँग्रेस सरकारच्या काळात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रीही राहिले. तुळजापूर मतदार संघ व आमदार चव्हाण असे गणित बनले होते मात्र धाराशिव मतदार संघ बदलून तुळजापूर येथे पहिल्यांदा उभे राहिलेले भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा पराभव केला. 2019 मध्ये राणाजगजीतसिंह पाटील यांना 99 हजार 34 मते तर चव्हाण यांना 75 हजार 865 मते पडली, 23 हजार 169 मतांनी पाटील विजयी झाले. तुळजापूर मतदार संघात 3 लाख 82 हजार 467 मतदार असुन गेल्या 2019 च्या निवडणुकीत 3 लाख 51 हजार 842 मतदार होते, 30 हजार 625 मतांची वाढ झाली आहे.