तुळजापूर / धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांना येत्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याची घोषणा मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर तुळजापुर येथे केली. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली त्यांनतर ते पत्रकार यांच्याशी बोलत होते.
तुळजाभवानी देवीच्या मंदीराच्या व परिसराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचे टेंडर/निविदा प्रसिद्ध झाल्या असुन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तुळजाभवानी मंदीर संस्थानला भाविकांनी अर्पण केलेल्या पैशातुन अर्थात स्वनिधीतुन ही 58 कोटी रुपयांची जीर्णोद्धारची कामे केली जाणार आहेत. ही कामे करताना अनेक वेळा मंदिरात काही बदल करावे लागणार आहेत त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ ओम्बासे यांनी केले आहे. मान्यवर यांच्या उपस्थितीत भुमीपुजन कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले. आगामी 2-3 वर्ष ही कामे चालणार असुन ती पुर्ण झाल्यावर मंदीर व परिसराचा कायापालट होणार असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे म्हणाले.
तुळजाभवानी मंदीराची विकास कामे म्हणजे जतन व दुरुस्ती करताना जुने रूप कायम ठेवले जाणार असुन ही कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहेत. पुरातत्व विभागाच्या टीमने इथे येऊन मंदीर परिसराची पाहणी सुद्धा केली आहे. जीर्णोद्धार करताना भाविकांना विविध सुविधा व स्थानिक लोक, बाजारपेठ यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही डॉ ओम्बासे म्हणाले.
तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे 6 भाग म्हणजे टप्पे करण्यात आले आहेत त्यात पहिला भागात भुयारी मार्ग,यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदीर जतन व दुरुस्ती हे 11 कोटी 36 लाखांचे काम आहे. दुसरा भागात कार्यलयीन, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी,खुला प्रेक्षक मंच, गोमूख तीर्थ, दत्त मंदीर, मातंगी मंदीर,कल्लोळ तीर्थ, निंबाळकर महाद्वार,मार्तंड ऋषी मंदीर, टोळ भैरव मंदीर, दीप माळ, शिवाजी महाद्वार व ओवऱ्या,खंडोबा व यमाई मंदीर जतन व दुरुस्ती अशी 12 कोटी 9 लाखांची कामे आहेत.
तिसरा भागात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 46 लाखांची कामे आहेत. चौथा भागात महंत तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या,आराध्य खोलीवरील ओव्हऱ्या, आराध्य खोली दगडी फरशी जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 45 लाखांची कामे आहेत.
पाचवा भागात मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वार जतन व दुरुस्तीचे 7 कोटी 21 लाख आणि सहावा भागात लिफ्ट व रॅम्पचे 4 कोटी 25 लाख असे 53 कोटी 84 लाख 47 हजार 7 रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.