धाराशिव – समय सारथी
वैद्यकीय बिले, पगार, किरकोळ रजा या कामासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना एका डॉक्टरला धाराशिव येथील लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन कालिदास गुंड यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
तक्रारदार हे कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नोकरीस आहेत. त्यांचे पगार , वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे अधिकार यातील आलोसे डॉ. नितीन गुंड वैद्यकीय अधिकारी यांना आहेत. यातील आलोसे यांनी यातील तक्रारदार यांची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी व सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 3 हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून 3 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड, सापळा पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अंमलदार इप्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.