धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील नगर पालीकेवर गेली अडीच वर्ष झाली प्रशासक असुन नगर पालिकेचा पूर्ण कारभार महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली होत आहे,शहरातील संपूर्ण रस्त्याची दुरअवस्था खड्डेग्रस्त रस्त्याच्या चे कारणीभूत असलेले बेशरम महाराष्ट्र शासन (वधू) व बेजबाबदार नगर पालीका (वर) यांचे प्रतिकात्मक लग्न लावून युवासेना धाराशिव शहरात व्यंगात्मक वरात काढणार आहे. एक सजग नागरिक म्हणून खराब रस्त्याचा निषेध करण्यासाठी या वरातीमधे सामील व्हा. असे आवाहन ढोबळे यांनी केले आहे. सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता राजमाता जिजाऊ चौक,बार्शी नाका येथून वरातीला सुरुवात होईल त्यानंतर लग्न लावले जाईल. आंदोलनाची ही संकल्पना माजी नगरसेवक, युवासेना जिल्हाध्यक्ष तथा युवासेना विभागीय सचिव अक्षय संजीव ढोबळे यांनी मांडली आहे.
धाराशीव शहरातील जवळपास सर्व रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे.दुचाकी व चारचाकी गाडी चालवणे कठीण झाले असून आणि भर पावसाळ्यात रस्त्यावर चिखल झाला आहे त्यामुळे गाडी घसरून पडण्याचे व अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषदेला निवेदन दिली मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. धाराशिव शहरातील नागरिकांचा आता संताप अनावर झाला असून प्रशासनाने योग्य तो उपाययोजना करणे गरजेचे आहे. खड्ड्यामुळे नागरिकांचे मणके खराब होत असून इतर आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे.