सावधान – 5 G सेवेच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, दिवाळी ऑफरच्या अमिषाला बळी पडू नका
उस्मानाबाद पोलीस व सायबर विभागाची विशेष जनजागृती मोहीम
उस्मानाबाद – समय सारथी
5 G सेवेच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस व सायबर विभागाने जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑनलाईन फसवणूकीच्या या नवीन फंडा लोकांना माहित होणे गरजेचे असून काही मोजक्या शहरात इंटरनेटची ही सुविधा सुरु झाली आहे मात्र त्याच्या नावाखाली बँक, मोबाईल खाते याची गोपनीय माहिती मागवून फसवणूक होऊ शकते तसेच दिवाळी सण जवळ आल्याने विविध आकर्षक ऑफर, खरेदीवर सूट व गिफ्ट याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाऊ शकते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी व फसवणूक झाल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, बसस्थानकात जनजागृतीची मोहीम सुरु आहे.
सायबर क्राईममधील नवीन प्रकाराला बळी पडू नका असे सांगत सायबर विभाग सध्या जनजागृतीची मोहीम राबवीत आहे. कमी कागदपत्रे किंवा तात्काळ ऑनलाईन लोन योजना, दिवाळी ऑफर व गिफ्ट, फसव्या डिस्काउंट ऑफर देणाऱ्या साईट, 5 G सेवा, फोनवर ऑनलाईन सेक्स प्रकार टाळावेत तसेच सेक्स फोन, पॉर्न साईट व फोटो देऊ नयेत तसेच कोणताही कॉल आल्यावर बँकेचे ओटीपी व पिन नंबर तसेच कार्डवरील सीव्हीव्ही नंबर देऊ नये. अनावश्यक अँप डाउनलोड न करणे, वेब लिंकवर पूर्ण माहिती न देणे व न वाचता ऑलो करणे हे प्रकार टाळावा तसेच फसवणूक झाल्यास तक्रार लवकर करणे व न घाबरता पुढे येणे गरजेचे आहे असे आवाहन सायबर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक के एस पटेल यांनी केले.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक के एस पटेल, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजु हलसे, राहुल नाईकवाडी, कावरे, कॉन्स्टेबल प्रकाश भोसले, अनिल भोसले हे अभियान राबवित आहेत.
नुकतीच भारतात “फाईव्ह जी” तंत्र प्रणाली सादर झाली आहे. फोर जी पेक्षा अधिक वेगवान व इतरही अनेक सुविधा देणारी फाईव्ह जी प्रणाली नक्कीच फायद्याची आहे त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी आतुर असणार आहेत हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्रकार देखील आणला आहे.
गुन्ह्याचा प्रकार :
तुम्हाला मेसेज येईल अथवा कॉल देखील येऊ शकतो की तुमच्या मोबाईलमधील फोर जी प्रणाली अपग्रेड करून फाईव्ह जी करून घ्या. त्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करा. अथवा सोबत दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती जाणून घ्या. तुम्हाला यात संशय फारसा येत नाही आणि तुम्ही त्याप्रमाणे करता आणि नंतर लक्षात येते की आपण फसलो आहे.
त्यांनी दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केले तर त्या लिंकमधूनच तुमच्या मोबाईलमध्ये हॅकिंग व्हायरस घुसवला जातो आणि तुमचा फोनच हॅक होतो आणि मग तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा (फोटो / चॅटिंग / बँकिंग डिटेल्स) चोरले जातात आणि त्यानुसार मग आर्थिक अथवा भावनिक ब्लॅकमेल करून पैसे लुटले जातात किंवा त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल केला तर त्यांच्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला सांगा असे म्हटले जात. तुम्ही तो त्यांना दिला की दुसऱ्या मिनिटाला लक्षात येईल की तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे पळवले गेले आहेत. कारण तुमचा फोन सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेला असतो. तेव्हा कृपया अशा कोणत्याही कॉलला व मेसेजला अजिबात प्रतिसाद करू नका
सावधगिरीचा उपाय :
या धोक्यापासून वाचण्यासाठी सोप्पा उपाय आहे. तुमचा नंबर (सिम कार्ड) ज्या कंपनीचे आहे त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या lतुमच्या जवळच्या शोरूममध्ये स्वतः तुम्ही जा आणि त्यांच्याकडून तुमचे सिम अपग्रेड करून घ्या ते सर्वात सेफ आहे. तुमच्या तुम्ही कुणीतरी म्हटलं म्हणून स्वतःच ऑनलाईन पद्धतीने अपग्रेड करणे धोक्याचे आहे.