सुनावणी – जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील करोडोचा घोटाळा, लोकायुक्त यांच्या निर्णयाकडे लक्ष
कामगारांची बोगस नोंदणी व लाभार्थी – अधिकारी यांच्यासह दलालांची टोळी रडारवर
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या तक्रारीवर उद्या 12 ऑक्टोबर रोजी बुधवारी लोकायुक्त यांच्याकडे सुनावणी होणार आहे, मनसेचे पाशा शेख यांनी याबाबत लेखी तक्रार केली असून त्यावर ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार आहे. उस्मानाबाद येथील कामगार कार्यालयात विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस कामगार नोंदणी व बोगस लाभार्थी दाखवून 30 कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार अधिकारी व एजन्ट यांनी केल्याची तक्रार केली आहे.
कामगार कार्यालयातील एका प्रकरणात लाचलुचपत विभागाने गेल्या महिन्यात तब्बल 7 तत्कालीन कामगार अधिकारी यांच्यासह दलाल व लाभार्थी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे त्याचा तपास सुरु आहे त्यातच या घोटाळ्यातील सहभागी पाशा शेख यांनी कागदपत्रसह पोलखोल करीत लोकायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करीत सखोल चौकशीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
2014 ते 2017 या व त्यानंतर कोरोना काळात कामगार मंडळाच्या अंतर्गत बांधकाम मंजूर व त्यांच्या पाल्यासाठी असलेल्या विविध योजनेत हा अपहार केल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे कामगार विभागच्या अवर सचिवानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी पत्र लिहून मंडळामध्ये कामगारांची नोंदणी व लाभ वाटपामध्ये प्रशासकीय व आर्थिक अनियमितता झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे त्यामुळे लोकायुक्त काय निर्णय देतात याकडे लक्ष लागले आहे.
असा केला आहे घोटाळा
कामगार विभाग मार्फत कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात त्यात कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.या योजनेचा लाभ देण्यासाठी जे कामगार नाहीत त्यांना कागदोपत्री कामगार दाखविण्यात आले शिवाय काहींना एकाच वर्षात 2 वेळेस लाभ देण्यात आला तर सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांना कामगार दाखवून योजनेचे पैसे लाटण्यात आले. कॅन्सर सारखे गंभीर आजार नसताना कागदपत्र तयार करुन योजना लाटल्या आहेत तर विदयार्थी यांचे अनेक कागदपत्रे खोटी आहेत. अनेक कामगारांना साहित्य दिलेले नसताना नोंदी आहेत.
कामगार विभाग हा गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून विविध योजना राबविण्यासाठी येथे सर्रास लाच घेतली जाते तर येथे काही संघटनाचे पुढारी कम दलालांचा सुळसुळाट आहे. कामगारांसाठी असलेली योजना हे काही अधिकारी व दलाल बोगस नोंदणी करुन लाटत आहेत. कामगारांसाठी असलेल्या मध्यानह भोजन योजनासह सुरक्षा उपकरणे पुरवठा योजनेचे असेच प्रकार असल्याने चौकशीची गरज आहे.
यांच्यावर यापूर्वी गुन्हा नोंद, तपास सुरु
शासनाची योजना हडप करण्याच्या उद्देशाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन बोगस कामगारांची नोंद करुन अनुदान लाटल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक व विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी जे व्ही मिटके, एस आर सोलंकर, अजिंक्य पवार, एम आर काकडे, ए ए देशपांडे, एस जी वैद्य, जी एस राऊत या 7 अधिकारी व घोटाळ्यात सहभागी असलेले प्रमोद रामचंद्र कुलकर्णी (उंबरे कोठा, उस्मानाबाद), सय्यद अतीखउल्ला हुसेनी असदउल्ला हुसेनी( खाजा नगर, उस्मानाबाद) व पाशुमिया बाबुलाल शेख (महाळंगी, तालुका उस्मानाबाद) यांचा समावेश आहे.
शासनाच्या मालमत्तेची अफरातफर करण्यासाठी या 10 जणांनी संगणमत करुन खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली व त्याचा लाभ घेण्यासाठी वापर केला व प्राथमिक तपासात 2 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली तसेच घोटाळा केल्यानंतर तो उघड होऊ नये यासाठी पुराव्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली काही कागदपत्रे नष्ट केली असे तपासात उघड झाले. 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2017 या काळात हा घोटाळा घेतला असून तो खोदण्यात लाचलुचपत विभागाला यश आले आहे. हे एक उदाहरण असून या अनुषंगाने संपूर्ण तपास करावा अशी मागणी पाशा शेख यांनी केली आहे.