धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत सर्वोच्च असा 2 हजार 825 रुपये इतका भाव दिला असुन बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथील मोळीपुजन कार्यक्रमात हा भाव जाहीर केला होता त्याप्रमाणे बिले दिली आहेत.
चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत, कार्यकारी संचालक केशव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांच्या प्रयत्नातून हा कारखाना यशस्वीपणे चालवला जात आहे. भैरवनाथ शुगर वर्क्सचे तेरणा कारखाना हे 6 वे साखर कारखान्याचे युनिट आहे.
तेरणा सुरु होणार म्हणलं की अनेकांना घाम फुटला,काही कारखाने सुरु झाले, नुसतं मोळी टाकायचा कार्यक्रम आला की गुळ व इतर साखर कारखाने यांनी भाव जाहीर केले. 150 ते 175 कोटी खर्च करुन आपण तेरणा सुरु केला. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत असुन सगळ्यांनी 2 हजार 800 भाव जाहीर केला त्यामुळे त्यापेक्षा 25 रुपये जास्त म्हणजे 2 हजार 825 पहिली उचल जाहीर करीत असल्याचे पालकमंत्री डॉ सावंत मोळीपुजन कार्यक्रमात म्हणाले होते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.यामुळेच ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोजगार,व्यवसाय आणि उद्योगधंदयाना चालना मिळते.भैरवनाथ उद्योग समूहाने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यामुळेच चालविण्यासाठी घेतला असल्याचे मंत्री सावंत म्हणाले.
भैरवनाथ समुहाने तेरणेचा लढा जिंकला
तेरणा कारखाना 2012 पासून म्हणजे तब्बल 10 वर्षांपासून बंद पडून भंगार अवस्थेत गेला होता. हजारो कामगार यांचे रोजगार गेल्याने ते बेघर झाले तर 30 ते 40 हजार शेतकरी व सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, भैरवनाथ उद्योग समूह व ट्वेंटीवन उद्योग समूह याचा उच्च न्यायालय, डीआरटी व डीआरएटी कोर्ट असा वाद चालला मात्र अखेर तो भैरवनाथ समुहाला मिळाला.
उस्मानाबाद जिल्हा बँकेने तेरणा 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी 12 नोव्हेंबर 21 रोजी सहाव्या वेळेस निविदा प्रसिद्धी केली होती. 25 नोव्हेंबर 21 रोजी उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निविदा उघडण्यात आल्या त्यात भैरवनाथ साखर उद्योग समूहाने भरलेली निविदा मान्य करत मंजुर करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा बँक,अवसायक व भैरवनाथ उद्योग समूह यांच्यात 6 डिसेंबर 21 रोजी त्रिस्तरीय करार केला गेला मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांचा ट्वेंटीवन समूह वारंवार कोर्टात जात होता त्यामुळे अडथळा आला. अखेर तेरणा 2023 ला सुरु झाला व पहिल्याच हंगामात चांगला विक्रमी भाव मिळाला.