दिवाळीतील आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात – जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते रेशन दुकानातून वाटप सुरु
उस्मानाबाद – समय सारथी
दिवाळी निमित्त नागरिकांना रेशन दुकानातून आनंदाचा शिधा देण्यास उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. आळणी या गावात जिल्हाधिकारी यांनी स्वतः गावात जात शिधा वाटप केला व नागरिकांच्या समस्या जाणून घेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यासह सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख लाभार्थीना रेशन दुकानातून डाळ, रवा, साखर व पामतेल हे 100 रुपये मध्ये देण्यात येत असून त्याचे वितरण रेशन दुकानातून आजपासून सुरु झाले आहे. येत्या 2 दिवसात सर्व लाभार्थी यांना वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे म्हणाले तर महागाई व पावसाच्या नैसर्गिक संकटात हा शिधा मिळाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत दिवाळी गोड होणार अशी प्रतिक्रिया लाभार्थी नागरिकांनी दिली.