पीक विमा कंपनीला नोटीस बजावली – 7 दिवसांत रक्कम जमा करण्याचे पुणे तहसीलदारांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
खरीप 2020 मधील हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे 344 कोटी रुपये न दिल्याने बजाज अलायन्स विमा कंपनीला पुणे तहसीलदार यांनी नोटीस बजावली असून 7 दिवसात रक्कम जमा न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी 7 दिवसांचे आमरण उपोषण केले होते त्यानंतर विमा कंपनीची मालमत्ता जप्त करुन रक्कम वसुलीची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना पत्र देऊन जमीन महसूल अधिनियमाच्या अंतर्गत बजाज अलायन्स विमा कंपनीची मालमत्ता जप्त करीत रकमेची वसुली करावी अशी विनंती केली. यानंतर आमदार कैलास पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी देशमुख यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली होती त्यानुसार पुणे तहसीलदार राधिका हवळ-बारटक्के यांनी विमा कंपनीचे कार्यकारी संचालक आशिष अग्रवाल यांना नोटीस पाठवून ७ दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थकबाकी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
जोपर्यंत ही रक्कम वसूल होऊन आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आपला लढा व पाठपुरावा असाच कायम राहणार असे आमदार पाटील यांनी सांगितले.