आरोग्य क्रांती – ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात 3 कोटींच्यावर महिलांची तपासणी, आरोग्यमंत्री डॉ सावंत
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यातील महिलांचा ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या या अभियानात आतापर्यंत सुमारे 3 कोटी 10 लाख 65 हजार महिलांची तपासणी करण्यात आली आहे. हे अभियान 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे व पुढेही पाठपुरावा केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले.
राज्यातील 4 कोटी 66 लाख 69 हजार महिला पैकी 3 कोटी 10 लाख महिलांची तपासणी करण्यात आली असून सर्व महिलांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून कामाला लागली आहे. आरोग्यात महाराष्ट्राला देशात नंबर 1 बनविण्याचा संकल्प डॉ. सावंत यांनी केला आहे.
राज्यात 18 वर्षावरील महिला, माता, गर्भवती यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक 26 सप्टेंबरपासून आरोग्य तपासणी कार्यक्रम एकात्मिक बाल विकास विभाग व इतर विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. राज्यातील महिलांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री सावंत यांनी केले आहे. राज्यातील 18 वर्षावरील महिलांना, मातांना, गर्भवतींना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे उद्दिष्ट आहे.
सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैद्यकिय अधिकारी आणि स्त्री रोगतज्ञामार्फत 18 वर्षावरील महिलांची, नवविवाहीत महिला, गर्भवती यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.आशा व अंगणवाडी आरोग्य सेविका, सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान-नाक-घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे व महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील, याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
अभियानाचे यश व तपासणीची आकडेवारी
आतापर्यंत एकूण 3,10,65,671 महिलांची तपासणी करण्यात आली.30 वर्षावरील 1 लाख 90 हजार महिलांना मधुमेह तर 3 लाख 20 हजार 716 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान तर 21 हजार 939 महिलांना हृदयविकाराचे निदान झाले आहे. 38 हजार 215 महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली.