कारवाईचा दणका, व्याप्ती वाढली – आणखी 7 जण दोषी तर सरपंच निर्दोष
शोषखड्डे भ्रष्टाचार प्रकरण – सेवा समाप्तीसह अपात्रता, ‘राव’ मोकाट तर काही रडारवर
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीमधील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या शोषखड्डे भ्रष्टाचार प्रकरणात 7 सदस्य असलेल्या पडताळणी समितीचा अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. 1 कोटी 12 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात आणखी 7 जण दोषी सापडले असून त्यांच्यावर कारवाईस सुरुवात झाली आहे. मेडसिंगा, उपळा व बेंबळी या तिन्ही गावातील घोटाळ्यात सहभाग असल्याने पालक तांत्रिक अधिकारी श्रीमती एस आर कांबळे यांच्यावर सेवा समाप्तीचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांनी दिले आहेत. या सेवा समाप्ती आदेशामुळे भ्रष्ट टोळीचे धाबे दणाणले आहे.
भ्रष्टाचाराचा हा तायडे पॅटर्न चांगलाच अंगलट आला असून यात आणखी अनेक जणांची विकेट पडणार आहे.घोटाळ्याची ‘जान’ असलेले काही ‘राव’ मोकाट आहेत तर मास्टर माईंड असलेले काही अधिकारी रडारवर आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकारी यांच्या इतर गावातील कारभाराची व उस्मानाबाद पंचायत समितीच्या विशेष लेखा परीक्षणाची गरज आहे.
मेडसिंगा, बेंबळी व उपळा येथील गावपुढारी असलेल्या सरपंचांना क्लीन चिट देण्यात आली आहे तर बेंबळी गावचे विद्यमान उपसरपंच नितीन शिवाजी इंगळे हे यात अडकले आहेत. अनियमिततेस जबाबदार असलेल्या ग्रामसेवक ए व्ही आगळे व एस बी सुर्वे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ग्रामरोजगार सेवक श्रीमती रितापुरे, गणेश शित्रे व सूर्यकांत माने यांना कामावरून कमी करण्यास संबंधित ग्रामपंचायत यांना कळविले आहे तर बेंबळी गावचे उपसरपंच नितीन इंगळे यांना ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 अन्वये अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
मेडसिंगा येथील प्रकरणात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस व्ही सुर्वे, पालक तांत्रिक अधिकारी श्रीमती एस आर कांबळे, रोजगार सेवक गणेश श्रीरंग शित्रे यांना दोषी ठरविण्यात आले आहे तर हजेरीपत्रकावर कुठेही सरपंच यांची सही नसल्याने ते या घोटाळ्यात सहभागी नसल्याचा लेखी अहवाल दिला आहे.
बेंबळी येथील प्रकरणात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ए व्ही आगळे, पालक तांत्रिक अधिकारी श्रीमती एस आर कांबळे, विद्यमान उपसरपंच नितीन शिवाजी इंगळे, रोजगार सेवक सूर्यकांत अंबादास माने यांना दोषी ठरविले असून हजेरीपत्रकावर कुठेही सरपंच यांची सही नसल्याने ते या घोटाळ्यात सहभागी नसल्याचा लेखी अहवाल दिला आहे.
उपळा येथील प्रकरणात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ए व्ही आगळे, ग्रामरोजगार सेवक श्रीमती व्ही एस रितापुरे, पालक तांत्रिक अधिकारी श्रीमती एस आर कांबळे यांना दोषी ठरविले असुन हजेरीपत्रकावर कुठेही सरपंच यांची सही नसल्याने ते यात सहभागी नसल्याचा अहवाल दिला आहे.
मोजमाप पुस्तिकेत नोंदविलेल्या मूल्यांकनानुसार मेडसिंगा गावात 629 शोष खड्डे आहेत मात्र त्यापैकी प्रत्यक्षात 271 खड्डे असून 358 खड्ड्याची ताफावत आहे. उपळा गावात 1 हजार 100 पैकी 241 खड्डे असून 859 शोषखड्डे नाहीत तर बेंबळी येथे 1099 पैकी 285 खड्डे दिसत असून 814 खड्डे नाहीत.
उस्मानाबाद पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी एस डी तायडे, सहायक लेखा अधिकारी आर जे लोध व क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर विश्वनाथ राऊत यांना यापूर्वीच दोषी ठरविले असून तायडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताना दिला आहे तर लेखाधिकारी लोध यांना निलंबित करुन राऊत याची सेवासमाप्ती केली आहे. राऊत याने 25 लाख, लोध याने 20 तर तायडे यांनी 16 लाख भरले असून त्याची आयकर व लाचलुचपत विभागाच्या चौकशीची गरज आहे.
ढोकी बाबत 2 अहवाल आल्याने संशय – घोटाळ्यात घोटाळा ?
ढोकी येथील शोषखड्डे कामाची तपासणी केली असून त्यात अनियमितता आढळून आली नाही असा अहवाल दिला आहे तर वडगाव सिद्धेश्वर येथे कोणत्याही प्रकरणे काम केले नसल्याने अपहार झाला नाही असा अभिप्राय दिला आहे.ढोकी येथे 726 पैकी 730 खड्डे असून मंजुरीपेक्षा अधिक काम केले आहे. यापूर्वीच्या गटविकास अधिकारी यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या अहवालात ढोकी येथे 25 लाख 75 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत तायडेसह 3 जणावर रक्कम वसुलीची कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यामुळे ढोकी बाबत 2 वेगवेगळे अहवाल समोर आले आहे त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. घोटाळ्याच्या चौकशीतच घोटाळा निघू नये म्हणजे झाले. खेड गावची स्वतंत्र चौकशी सुरु आहे त्यात अनेक गंभीर चुका आहेत.