शेवगा लागवड घोटाळ्याचा ‘स्वामी’ कोण ? पैसे वसुलीसाठी खासगी ‘लष्कर’
मस्टर शून्य करण्याचा नाद, अर्थपुर्ण व्यवहार केला तरच मंजुरी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीमधील शोषखड्डे घोटाळ्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेली शेवगा लागवड योजना भ्रष्टाचाराच्या आरोपासह चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या शेवगा लागवड घोटाळ्याचा ‘स्वामी’ कोण याची चर्चा रंगली असून पैसे वसुलीसाठी काही खासगी लोक ठेवण्यात आले होते या ‘लष्कराची’ सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. प्रत्येक मान्यतेला व मस्टरला पैसे असे रेटकार्ड ठरले होते, अर्थपूर्ण व्यवहार केला तरच मंजुरी नाहीतर मस्टर शून्य असाच काहीसा नियम होता. पैशाची चटक लागल्याने ते नाही मिळाले तर मस्टर शून्य करायचा नाद आता भोवणार आहे. शेवगा लागवड आरोप प्रकरणी 5 सदस्यीय समिती नेमली आहे त्याच्या अहवालकडे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सन 2021-22 या आर्थिक वर्षात पंचायत समिती अंतर्गत शेवगा लागवडीची 126 तर 2022-23 या चालू वर्षात 28 कामे करण्यात आली. त्यात अकुशल कामावर 1 कोटी 61 लाख तर कुशल कामावर 16 लाख 24 हजार असा 1 कोटी 77 लाख खर्च करण्यात आले तर चालू वर्षी 9 लाख 53 हजार खर्च केले. एकंदरीत या योजनेवर 1 कोटी 87 लाख खर्च करण्यात आले.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा मग्रारोहयोचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमली असून 7 दिवसात 11 मुद्द्यावर स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शेवगा लागवड योजनेत किती प्रस्तावना तांत्रिक मान्यता कधी देण्यात आली व झालेला विलंब आणि जबाबदार अधिकारी यासह प्रशासकीय व तांत्रिक मान्यतामधील अंतर,किती हजेरीपत्रक शून्य रकमेने देण्यात आली त्याचे कारण व जबाबदार अधिकारी यांचा अहवाल मागितला आहे. कुशल देयकाची मागणी माहिती, पैसे घेत असल्याच्या तक्रारीची सत्यता, प्रलंबित प्रस्ताव, लागवड न करता अनुदान उचलेल्या प्रकरणांची ग्रामपंचायत निहाय माहिती देऊन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले
खासगी व्यक्तींच्या हाती सरकारी कारभार, चौकशी होणार का ?
उस्मानाबाद पंचायत समितीच्या कार्यालयात मग्रारोहयो विभागात लष्करे नावाची व्यक्ती शासकीय नौकर नसताना काम करीत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व रोहयो उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. लष्करे हे मजुरांची काम मागणी आज स्वीकारने तसेच नरेगा अंतर्गत कामे करीत असल्याचे पत्रात म्हणटले आहे. लष्करे हे कार्यरत असल्यास त्यांची कागदपत्रे रोहयो उपजिल्हाधिकारी यांनी 21 सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र देत मागितली होती मात्र अशी व्यक्ती नसल्याचे कळविले आहे. मग शेतकऱ्यांनी तक्रार केलेली ती व्यक्ती कोण ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.