रेल्वे फास्ट ट्रॅकवर – सोलापूर, तुळजापूर ते उस्मानाबाद रेल्वेवेसाठी ४५२ कोटींच्या सहभागास मान्यता
उस्मानाबाद – समय सारथी
सोलापूर – तुळजापूर- उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर करण्यात येऊन यासाठी राज्य शासनाने ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने त्यांचा वाटा दिल्याने पुढील प्रक्रिया जलद गतीने होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकारच्या काळात हे काम मार्गी लागत असल्याने उस्मानाबादकरांचे स्वप्न पुर्ण होण्याचा मोकळा झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर रेल्वे मार्ग करणार अशी घोषणा केली होती. हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटन विकासासह अन्य विकासाला मदत होणार आहे.
मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार असून हा विभाग ३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत राहील.
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार.अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार फायदा. गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देणार. अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता दिली असून ४३१७ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ३६५९ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीचा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली.