धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या स्थापत्य कामाची निविदा प्रक्रिया व कामाच्या दर्जाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. घनकचरा प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी एक त्रिसदस्य समिती नेमली आहे, आमदार धस यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी असे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
धाराशिव नगर परिषदेतील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 2018 ते 2021 या कालावधीत स्थापत्य विभागातील काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार धस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात केला आहे. कामाच्या नावाने निविदा काढणे आवश्यक असताना जुन्याच कंत्राटदाराला जास्त दराने कामे मंजुर केली गेली. ओला कचरा, सुका कचरा विलगीकरण व कचऱ्यावर प्रक्रिया न करताच देयके अदा करण्यात आली आहेत. आज रोजी विलगीकरणाची कोणतीही यंत्रणा नसल्या कारणाने विलगीकरण प्रक्रिया होत नाही.
अनेक कामे प्रत्यक्षात झाली नसुन या कामाची देयके काम न करता उचलली असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला असुन अंदाजे 95 टक्के कामाची बोगस देयके उचलले आहेत असे समजते. त्यामुळे नगर परिषद येथील घनकचरा व्यवस्थापन कामाची देयके व कामात झालेल्या अपहराची चौकशी करुन संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी धस यांनी केली आहे.
धाराशिव नगर परिषदेच्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी 3 सदस्य असलेली चौकशी समिती नेमली असुन नळदुर्ग नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व उमरगा नगर परिषदेचे लेखा परीक्षक अंकुश माने यांचा समावेश आहे. निविदा प्रक्रिया, कामाचा दर्जा व गुणवत्ता याची तपासणी करुन 7 दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.