कुणबी मराठा अहवाल शासनाला सादर – निर्णयाकडे लक्ष
इम्पेरियर गॅझेटमध्ये जनगणनासह कुणबी नोंद तर 102 ठिकाणी सापडली कुणबी कागदपत्रे
धाराशिव – समय सारथी
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी 3 वेगवेगळ्या मुद्यावर लेखी अहवाल सादर केला असुन त्यात अनेक बाबी समोर आल्या आहेत. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र दिल्याची संख्या, अभिलेख नोंदी व महसूली पुरावेसह वंशावळ माहिती अश्या 3 वेगवेगळ्या स्वरूपात सविस्तर अहवाल कागदपत्रासह सादर केला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
ब्रिटिश यांच्या इम्पेरियर गॅझेटीयरमध्ये पान क्रमांक 262 व 263 वर जात व व्यवसाय या परिच्छेदात The Most Numerous Caste is that of the Kunbis (Maratha) who number 2 lakh 5 thousand or 38 % Of the Total Population. ही महत्वाची नोंद सापडली आहे. गुलबर्गा विभागात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, परंडा हे सध्याचे तालुके व तत्कालीन नळदुर्ग तालुका व औसा हा भाग होता.त्यात 6 शहरे व 860 गावे होती त्यात 1901 साली 5 लाख 35 हजार लोकसंख्या होती, 58 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती होता. कुणबी म्हणजे मराठा अशी महत्वाची नोंद सापडली आहे.
गेल्या 5 वर्षात केवळ 7 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असुन त्यात उमरगा तालुक्यात 5 तर धाराशिव तालुक्यात 2 जात प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. 7 जणांनी कागदपत्रेसह अर्ज केले त्यांना ते मिळाले. एकही अर्ज नाकरण्यात आला नाही.
धाराशिव जिल्ह्यातील महसूली अभिलेखे असलेली गाव नमुना 14, नोंदणीकृत दस्त, मुंतखब, खासरा पाहणी, अर्धन्यायिक प्रकरणाच्या संचिका, इनाम रजिस्टर, शेतवार बुक, जनगणना रजिस्टर अशी 18 हजार 116 अभिलेखे तपासणी गेली त्यातील 94 ठिकाणी कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या. 3 हजार 974 शैक्षणिक नोंदी तपासण्यात आल्या त्यातील केवळ 2 नोंदीवर 1967 पुर्वीची कुणबी नोंद सापडली. जन्म मृत्युच्या 55 हजार 946 नोंदी तपासण्यात आल्या त्यातील केवळ 5 ठिकाणी कुणबी नोंद सापडली. निजाम कालीन देण्यात आलेल्या 401 सनद तपासण्यात आल्या त्यातील एकही नोंद कुणबी सापडली नाही. अश्या प्रकारे 102 ठिकाणी कुणबी अशी नोंद सापडली.
धाराशिव व उमरगा तालुक्यात कुणबी अश्या नोंदी सापडल्या असुन त्यात धाराशिव तालुक्यातील कारी, अंबेजवळगा, येडशी यासह उमरगा तालुक्यात मुरूम, कुन्हाळी, येळी, गुंजोटी, आलूर या गावात महसूली तर 1967 पूर्वीच्या शैक्षणिक नोंदी कळंब तालुक्यातील बहुला व भुम तालुक्यातील लांजेश्वर या दोन गावात 2 जणांच्या नावाने कुणबी नोंद आहे तर 1967 नंतर तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यात शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी नोंद आहे.
निजाम काळात झालेले करार, सनद, इनाम, वतन, राष्ट्रीय दस्ताऐवज, विविध अर्धन्यायिक प्रकरणे तपासण्यात आली त्यात कुणबी नोंद सापडली नाही. निजामकालीन 1881 ते 1932 पर्यंत जनगणना नोंदी तपासल्या मात्र कुणबी नोंद सापडली नाही.