रोखठोक – आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर केली टीका
मी भीक घालत नाही, मोठं व खोट रेटून बोलायचं, जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही
30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला, सत्ता तुमच्याकडे होती त्यावेळी काय केले ?
आमदार राणाजगजीतसिंह पाटील सावंतांचे राजकीय मांडलीकत्व स्वीकारणार का ? की सावंत शैली बदलणार ?
उस्मानाबाद – समय सारथी
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव न घेता जिल्ह्याच्या मागासलेपणावर जाहीर भाषणातुन टीका केली. कोणाला काय वाटतंय, त्याला मी भीक घालत नाही, मला त्याच काही देणे घेणे नाही. नुसतं बोलणं वेगळं असते.गेली 30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला, सत्ता होती ना तुमच्याकडे त्यावेळी काय केले असा प्रश्न उपस्थित केला. मोठं व खोट रेटून बोलायचं जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही. लोक माझ्या मागे राहतील की नाही ? या भीतीमुळे प्रगती व विकास करायची नाही असे म्हणत सावंत यांनी टीका केली.
सत्तेतील भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व मंत्री सावंत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंत्री सावंत हे स्पष्टवक्ते व रोखठोक वक्तृत्व असलेले नेते म्हणून राज्यभर ओळखले जातात. गेल्या 40 वर्षात विकास न झाल्याचा मुद्दा मंत्री सावंत यांनी काढून पाटील कुटुंबाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात थेट टार्गेट केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी शिवजयंती कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांना राजकीय कटुता बाजूला ठेवून आदबीने जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सूचक राजकीय इशारा दिला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार पाटील यांच्यावर टीका केली.
भाजप आमदार राणा पाटील यांनी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या असमतोल निधी वाटपबाबत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची कायद्यावर बोट ठेवत थेट लेखी तक्रार प्रधान सचिवाकडे केली होती त्यानंतर वादाची ठिणगी पडली. आमदार राणा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करुन राजकीय मुद्दा न करता तो त्याच्या शैलीने प्रशासकीय पद्धतीने हाताळला, त्यानंतर अनेक प्रशासकीय घडामोडी झाल्या. विरोधकांवर सुद्धा टीका न करणाऱ्या आमदार राणा यांनी मंत्री सावंत यांची लेखी तक्रार दिल्यामागे भाजपचा ग्रीन सिग्नल असल्याचे बोलले जात आहे. सावंत यांचे जिल्ह्यातील वाढते राजकीय प्रस्थ व हस्तक्षेप याची या वादाला किनार आहे.
आमदार राणा पाटील यांना भाजपने मराठवाड्याचे नेतृत्व व चेहरा म्हणून लॉन्च केले आहे तर सावंत हे शिंदे गटाचे फायर ब्रँड मंत्री असुन सत्ता परिवर्तनाचे संस्थापक आहेत. जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे यावरून पेटलेला हा सुप्त वाद आता सावंत यांच्या आजच्या जाहीर कार्यक्रमातील टिकेमुळे वाढला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे मंत्री सावंत यांचे राजकीय मांडलीकत्व स्वीकारणार का ? की सावंत हे त्यांची आमदार राणा बाबतची भुमिका व शैली बदलणार हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.
माझं एक स्वप्न आहे, प्रगती ही नेत्यांची न होता जनतेची व्हावी. सर्वसामान्य जनतेची प्रगती पहिल्यांदा व्हायला हवी, जनतेची प्रगती झाली की निश्चित जिल्ह्याची प्रगती होते हे व्हिजन असले पाहीजे.मग काही नेत्यांना इतकी भीती वाटते की जनतेची प्रगती झाली की हे लोक माझ्या मागे राहतील की नाही ? मग प्रगतीच करायची नाही. मोठं मोठं खोटं रेटून बोलायचं, त्याच्यामुळे माझं व त्यांचं व्हिजनमध्ये जमीन असमानचा फरक आहे. जोपर्यंत सत्ता आहे, सत्तेत आहे आणि सहीचा अधिकार आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य जनतेसाठी तो अधिकार वापरून काम करेल असा विश्वास मंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
लोकांना दिलेल्या वाचनाची पूर्तता करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे.कोणाला काय वाटलं व काय वाटेल, अश्या या वाटण्यावर मी जात नाही.मी अश्या गोष्टींना भीक घालत नाही त्याचे मला काही देणे घेणे नाही कारण माझी बांधिलकी जनतेशी त्यांच्या विकासाशी आहे. नुसतं बोलणं वेगळं 30-40 वर्ष तुम्ही जिल्हा मागास ठेवला, सत्ता होती ना तुमच्याकडे ? काय केले तुम्ही ? त्यामुळे कोणाच्या चुका, उणीधुनी काढण्यापेक्षा जे अधिकार माझ्या हातात आहे त्याचा 100 टक्के नव्हे तर 200 टक्के वापर तळागाळातील जनतेसाठी करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
सगळ्यांनी ओरडायचं, रडायच आमचा जिल्हा मागासलेला आहे मात्र त्यासाठी आपण काय पावले उचलली याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.मागील सत्तेत 4 महिने मंत्री असताना जलसंधारणाची अनेक कामे केली. सरकार स्वतःसाठी चालवायचे की जनतेसाठी चालवायचे हे नेत्यांनी पहिल्यांदा ठरविले पाहिजे. आपण विश्वस्त असतो मालक नाही ही भुमिका हवी असे सावंत म्हणाले.
काही प्रशासकीय अधिकारी यांचे टोचले कान –
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे गाडीचे दोन चाक आहेत आणि या दोघांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. काही प्रशासकीय अधिकारी यांच्या डोक्यात हवा गेलेली असते, मी त्या काळातल्या सत्तेत होतो. तु कुठल्याही काळातल्या सत्तेत असलात, कोणाचा जरी चमचा असला तरी तु पहिला जनतेचा सेवक आहेस, जनतेची सेवा करण्यासाठी ठेवले आहे मालक म्हणून ठेवले नाही असे म्हणत काही प्रशासकीय अधिकारी यांचे कान टोचले. लोकांच्या भावना व अपेक्षा याची पूर्तता करण्यासाठी आम्हाला निवडून दिलेले असते म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी असतो त्याला लोकशाही म्हतात. जर सगळं प्रशासनाने पाहायचं असते तर लोकशाहीची निर्मिती झाली नसती.