धाराशिव – समय सारथी
नागरिकांचे मन व आरोग्य सुदृढ रहावे यासाठी ओपन जिम व हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले असून याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या मैदानावर ओपन जिम सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम पठाण, महेश क्षिरसागर, मंगेश साळवे, उपनिरीक्षक अनघा गोडगे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या नागरिकांना पूर्वी भीती वाटत होती. मात्र त्या नागरिकांमध्ये असलेली भीती दूर व्हावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छता, प्रकाश व बसण्यासाठी आसनाचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती नागरिकांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये नागरिकांना पोलिसांबरोबर सुसंवाद साधता यावा व आपल्या समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पोलीस अधिकारी अंमलदार, कर्मचारी, होमगार्डस् खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने होते.