धाराशिव – समय सारथी
महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम राज्यात युध्द पातळीवर राबिण्यात येत आहे.मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मराठा सर्वेक्षण ट्रैनिंग संपन्न झाले. सर्व तहसीलदार आपल्या टीमसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणसाठी उपस्थित आहेत.
सर्वेक्षण करताना ऑनलाइन माहिती भरत असताना खुल्या प्रवर्गाचा व्यक्ती असेल तर 121 प्रश्न संच असलेला फॉरमॅट आवश्यक माहिती भरण्यासाठी कार्यरत होईल. या सर्वेक्षणाची माहिती भरताना ती चार भागामध्ये असणार आहे. पहिल्या भागात संबंधित व्यक्तीची मुलभूत माहिती जसे- आधार कार्ड, पॅनकार्ड इ., दुसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची सामाजिक माहिती, तिसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची शैक्षणिक माहिती व चौथ्या भागात संबंधित व्यक्तीची आर्थिक माहिती असणार आहे. उक्त प्रमाणे 121 प्रश्नसंचाची माहिती पूर्ण भरल्यानंतर सिस्टीमवर कॅमेरा ऑन होवून संबंधित व्यक्तीचा फोटो व स्वाक्षरी घेण्यात येवून त्याची ही माहिती संगणक प्रणालीवर जमा होणार आहे.
सर्वेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना डॅशबोर्ड देण्यात येईल. त्यामध्ये सर्वेक्षणाची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. त्याआधारे या सर्वेक्षणाच्या प्रगतीची अद्ययावत माहिती अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगास उपलब्ध होणार आहे. तद्नंतर सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम हे 23 ते 31 जानेवारी या कालावधीत युध्द पातळीवर होणार आहे. या कामासाठी महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर विकास संस्था, शिक्षण विभागाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत राहतील.