धाराशिव – समय सारथी
सामुहिक शेततळ्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील कृषी अधिकारी संतोष बाबुराव हूरगट यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी कळंब तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी संतोष बाबुराव हुरगट यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी करून 20 हजार रुपये लाच घेतली. हूरगट यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी काम पहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय कररडे यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.