धाराशिव नगर परिषदेतील 27 कोटी 34 लाख अपहार प्रकरण
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील 27 कोटी 34 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात पोलिसांच्या विशेष तपास पथकाला महत्वाचे पुरावे व कागदपत्रे नगर परिषदेच्या कार्यालयातून मिळाली असुन आज आरोपी सुरज बोर्डे यांची पोलिस कोठडी संपत आहे. जवळपास 200 च्या आसपास प्रमाणके मिळाली असुन आणखी काही माहिती बोर्डे यांनी पोलिसांना दिली आहे.
महत्वाचे धागेदोरे मिळाल्याने बोर्डेची पोलिस कोठडी वाढवून मागितली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान कारागृहात असलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे व बोर्डे यांच्या आमनेसामने चौकशीला कोर्टाने परवानगी दिली असुन पोलिस बोर्डे यांना जेलमध्ये नेहून आमनेसामने चौकशी करणार आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड हे चौकशी करीत असुन अवघ्या 4 दिवसात आरोपीला अटक व महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत त्यामुळे तपासाला मोठी गती आली आहे. अजुनही अनेक देयके गायब आहेत तर अनेक विकास कामे निकृष्ट आहेत त्यामुळे कर्मचारी व ठेकेदार रडारवर आहेत.
6 जुलै 2020 ते 21 नोव्हेंबर 2022 या 28 महिन्यात 27 कोटी 34 लाख रुपयांच्या विकास कामाच्या बिलात अपहार झाला असुन तो दडवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांनी संगनमत केल्याची तक्रार नगर परिषदेने दिली होती त्यानंतर कलम 420,409,201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहार, फसवणूक, पुरावा नष्ट करणेसह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेतील तक्रारी अनुषंगाने चौकशीची मागणी केली होती याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली त्यात हा घोटाळा उघड झाला.
चौकशी समितीच्या अहवालानुसार 1 हजार 88 प्रमाणके गायब होती त्यात शासकीय देयके, विद्युत देयके, शासकीय कर, लाभार्थी,जाहिरात बिले, वेतन मानधन व इतर कर असे शासकीय खर्च केलेले 574 देयके आणि ठेकेदार, विकास योजना व किरकोळ खर्चाची 514 देयके अशी वर्गवारी करून अहवाल सादर करण्यात आला.