21 ऑक्टोबरला प्रथम अग्नीप्रदिपन कार्यक्रम – अर्थकारण बदलणार, तेरणा पुन्हा ठरणार केंद्रबिंदु
धाराशिव – समय सारथी
तेरणा साखर कारखाना पट्ट्यातील शेतकरी, कामगार व सभासद यांच्यासाठी 21 ऑक्टोबरचा दिवस हा सुवर्णक्षण असणार असुन तेरणेचे धुराडे तब्बल एका तपानंतर पेटणार आहे. तेरणा प्रत्यक्षात सुरु होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव, कामगारांना रोजगार मिळणार असुन या भागातील अर्थकारण बदलणार आहे. तेरणा पुन्हा एकदा या भागात केंद्रबिंदु ठरणार आहे.
2 जानेवारी रोजी तेरणेचा ताबा भैरवनाथ शुगर समुहाला देण्यात आला त्यानंतर 9 महिन्यात कारखान्याचे व परिसराची स्वच्छता, मशीन दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर आता तेरणा गाळपासाठी सज्ज झाला आहे. दररोज 6 हजार 500 मेट्रिक टन गाळप क्षमता, 50 केएलपीडी डिसलरी, 14 मेगावॉट वीज निर्मिती होणार असुन यामुळे 1 हजार कामगारांना रोजगार मिळणार आहे.
तेरणा साखर कारखान्याचा बॉयलर पेटणार असुन प्रथम बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रम 21 ऑक्टोबर रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ समूहाने हा कारखाना भाडेतत्वावर घेतला आहे. चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
भैरवनाथ शुगर वर्क्सचे हे 6 वे युनिट असुन या कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन व्हॉइस चेअरमन अनिल सावंत,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी केले आहे.
तेरणा पट्ट्यात या साखर कारखान्याचे मोठे महत्व आहे. तेरणा बंद पडल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव कमी मिळत होता.2 हजार 500 भाव असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार हे 1 हजार 600 ते 1 हजार 800 असा भाव देत त्यामुळे मोठी आर्थिक लुट व फसवणूक केली जायची मात्र आता तेरणेमुळे हक्काचा कारखाना मिळणार आहे.
गेल्या बारा वर्षापासून विविध कारणावरून बंद असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यामुळे सुरु होत असुन त्याचे धुराडे पेटणार आहे. तेरणा सुरु होणार असल्याने या भागातील अर्थकारणाबरोबरच राजकारणही बदलणार आहे. सत्ताकारणात तेरणा हा आजवर केंद्रबिंदु ठरला आहे त्यामुळे आगामी काळात सत्तेची गणिते सुद्धा बदलणार आहेत.
तेरणा कारखान्यावर माजी मंत्री डॉ पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजीतसिंह पाटील परिवाराची एकहाती सत्ता होती त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे डबघाईला आलेला व कर्जबाजारी झालेल्या तेरणा साखर कारखान्याची सत्ता आली मात्र त्यांना तो चालवता आला नाही व तेरणा बंद पडला. हजारो कामगार यांचे रोजगार गेल्याने ते बेघर झाले तर 30 ते 40 हजार शेतकरी व सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र आता तो सुरु होत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.