धाराशिव – समय सारथी
रोजगार देतो म्हणून परप्रांतीय मजूर आणत त्यांना डांबून ठेवत बळजबरीने 16 तास काम करून घेऊन मारहाण केल्या प्रकरणी 2 जणांवर परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौडगाव येथील शिवाजी सोमनाथ देवकर व समाधान अशोक पाडुळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 143(3),127(4),352,351(2),115(2),3(5) BNS सह कलम 16, 17,18 बंदबीगार अधि. उच्चाटन अधि. 1976 अंतर्गत गुन्हा नोंद झाला असुन पोलिस तपास सुरु आहे.
पुणे,मुंबई व ठाणे या रेल्वे स्टेशनवरून परप्रांतीय मजूर उचलून आणत त्यांना डांबून ठेवत बळजबरीने ऊस तोडी करून घेतल्याचा आरोप आहे. परंडा तालुक्यातील कौडगाव येथे हा सगळा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कार्यवाही करत या 42 मजुरांची सुटका केली आहे. ऊस तोडणीसाठी मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने ऊस तोडणी केले जात होती. त्यांना तुम्हाला चांगलं काम देतो असे म्हणत धाराशिव जिल्ह्यात आणण्यात आले.
धाराशिव येथे आल्यावर मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल व इतर साहित्य काढून घेत त्यांना दाबून ठेवण्यात आले. ज्या रूममध्ये ठेवण्यात आले, त्याच रूममध्ये प्रांत विधी देखील करायला लावायचे. सकाळी फक्त ऊस तोडण्यासाठी बाहेर व संध्याकाळी ऊस तोडल्यानंतर आत टाकले जायचे, जो कोणी विरोध करेल त्याला जबर मारहाण केली जायची. आता या मजुरानी आपल्या व्यथा रडून सांगत आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या अशी विनवणी केली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.












